Advertisement

  मेघगर्जनेसह कोसळणार पावसाची धार

प्रजापत्र | Saturday, 09/08/2025
बातमी शेअर करा

मुंबई : आठवडाभर विश्रांती घेतलेल्या पावसाने मागील दोन दिवसांपासून पुन्हा हजेरी लावली (Maharashtra Weather) आहे. राज्यभरात पावसाच्या सरी कोसळत असून उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आज पहाटेपासूनही राज्यातील अनेक भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत.

          हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, फिरोजपूरपासून, चंडीगड, देहरादून, खेरी, पाटणा, बंकुरा, दिघा ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. कर्नाटक आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंची तर बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. यामुळे बुधवार १३ ऑगस्टपर्यंत बंगालच्या उपसागरात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

 

महाराष्ट्रातील हवामान
आज मराठवाडा, विदर्भ आणि कोकण या भागात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने या भागांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबईत सकाळपासूनच हलक्या ते मध्यम स्वरुपात पाऊस सुरू असून वातावरण दमट आणि ढगाळ आहे. त्यामुळे मुंबई-ठाणे भागात पुढील २४ तासांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

 

मान्सूनच्या ‘ब्रेक’वर तज्ज्ञांचे मत
गेले काही दिवस मान्सूनने राज्यभरात मोथा ब्रेक घेतला होता. यामुळे नागरिकांना प्रचंड उकाड्याचा त्रास सहन करावा लागला होता. मात्र मान्सूनने हा ब्रेक कसा घेतला याबाबत हवामान तज्ज्ञांनी मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, ऑगस्ट महिन्यात साधारणपणे ‘ब्रेक-इन-मॉन्सून’ची परिस्थिती निर्माण होते, जी साधारण १० दिवस टिकते. यामुळे पावसाची सरासरीत घट होते. तर पुढील चार दिवसांत आणखी घट होण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले.

 

Advertisement

Advertisement