बीड दि.८(प्रतिनिधी): राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या अगोदर मतदारयाद्यांमध्ये मोठ्याप्रमाणावर नावे नोंदविली गेल्याचा आक्षेप काँग्रेसने नोंदविला होता, त्याला निवडणूक आयोगाने उत्तर देखील दिले, मात्र त्या खुलाशावर काँग्रेस पक्षाचे समाधान झालेले नाही, त्यामुळे या प्रकरणात पुढील दिशा ठरविणे आणि भविष्यात मतदारयाद्यांमध्ये गोंधळ होऊ नये यासाठी उपाययोजना सुचविण्यासाठी काँग्रेसने एक अंतर्गत समिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली आहे. यात बीड जिल्ह्यातून माजी मंत्री अशोक पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात मागच्या वर्षाच्या अखेरीला विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. त्या निवडणुकीत लोकसभेच्या तुलनेत मोठ्याप्रमाणावर मतदार वाढविण्यात आल्याचा आक्षेप काँग्रेस पक्षाने घेतला होता. या संदर्भात स्वतः राहुल गांधी यांनी देखील अनेकदा कठोर भाष्य करीत निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर भाष्य केले. काँग्रेसने पर्यट्कषात तक्रार केल्या नंतर निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या आक्षेपात तथ्य नसल्याचे व मतदारयादीत मतदारांची वाढ नियमानुसारच असल्याचे स्पष्ट केले होते.
मात्र आयोगाच्या या खुलाशाने काँग्रेसचे समाधान झालेले नाही. आता याविषयात पुढील दिशा काय असावी आणि भविष्यात मतदारयाद्यांमध्ये असला 'गोंधळ ' होऊ नये यासाठी काय पाऊले उचलावीत याच्या सूचना करण्यासाठी काँग्रेस पक्षाने एक अंतर्गत समिती गठीत केली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली गठीत या समितीत प्रफुल्ल गुडदे , माजी मंत्री अशोक पाटील, राजेश शर्मा, धनंजय चौधरी , परीक्षित जगताप हे सदस्य असणार असून समितीचे समन्वयक म्हणून अभय छाजेड काम पाहणार आहेत .

प्रजापत्र | Tuesday, 08/07/2025
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा