पुणे-एका बाजूला शेतमालाला दर नसल्यामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. तर दुसऱ्याबाजुला दुधाला दर नसल्यामुळं दूध उत्पादक शेतकरी संकटात आहेत. सातत्यानं दुधाचे दर कमी होताना दिसत आहे. याचा मोठा फटका दूध उत्पादकांना बसत आहे. आता या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी खासदार सुळे मैदानात उतरल्या आहेत. येत्या ७ दिवसात दुधाचे दर वाढवा अन्यथा रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नसल्याचा इशारा सुळेंनी दिला आहे.

दुधाच्या कमी झालेल्या दरांमुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका
शेतमालाला भाव नसल्याने अगोदरच अडचणीत असलेले शेतकरी आता दूधाच्या दरात घट झाल्यामुळे आणखी अडचणीत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतमालाला भाव नसल्यामुळे हवालदिल असलेल्या शेतकऱ्यांना दूधापासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा आधार होता. पण हे दर देखील कमी झाल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. एका बाजूला दुधाचे दर कमी होत असताना दुसऱ्या बाजुला पशुखाद्य, चारा यांचे दर अतिशय वाढलेले दिसत आहेत. दुधाच्या कमी झालेल्या दरांमुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहेत. हे लक्षात घेता माझी शासनाला विनंती आहे की, दूधाचे दर पुर्ववत करण्याच्या दृष्टीने सात दिवसांच्या आत शासनाने पावले उचलावीत. अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नसल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
उन्हामुळे दुध उत्पादनात घट
एका बाजुला उन्हामुळे दुधाच्या उत्पादनातही घट झाली. पाणी टंचाई, चाऱ्याचा प्रश्न, पशुखाद्याचे वाढते दर यामुळे दूध उत्पादक मेटाकुटीला आला आहे. काही दिवसांपूर्वी दोन रुपये वाढवलेले गाईच्या दुधाचे दर बहुतांश दूध संघांनी पुन्हा दोन रुपयांनी कमी केले आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. वाढता उत्पादन खर्च पाहता मिळणार दर योग्य नसल्याचे शेतकऱ्याचं म्हणणं आहे. राज्यात गाईच्या दुधाचे साधारणपणे दोन ते सव्वादोन कोटी लिटरपर्यंत संकलन होत असते. साधारणपणे कमी पाणी उपलब्धता असलेल्या भागातील शेतकरी शेतीला जोड म्हणून दूध व्यवसाय करतात. नगरसह नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, मराठवाडा, विदर्भासह अन्य भागांत तीव्र उन्हाळा असल्याने व उष्माची तीव्र आहे. या भागात चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच दुधाचे दर कमी झाल्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.
सध्या दुधाला दर किती?
दुधाच्या दराच्या संदर्भात पशुसंवर्धन विभाग आणि खरेदीदार संघांनी दुर्लक्ष केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून गाईच्या दुधाला पंचवीस रुपये प्रति लिटरला दर होता. मात्र, दीड महिन्यापूर्वी तो २७ रुपये करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा दोन रुपयांची वाढ करण्यात आली होती. म्हणजे दुधाचे दर जवळपास २९ रुपयांवर पोहोचले होते. अशातच आता पुन्हा २५ मेपासून दोन रुपयांनी दर कमी केले आहेत. त्यामुळे सध्या २९ रुपयांपर्यंत पोहोचलेल्या दुधाचे दर आता पुन्हा २७ रुपयांपर्यंत खाली आले आहे.

