Advertisement

चमत्कार दाखविण्याच्या बहाण्याने वृद्धाला लुटणाऱ्या सराईत गुन्हेगाराला नाशिकमधून अटक

प्रजापत्र | Monday, 26/10/2026
बातमी शेअर करा

परळी बसस्थानक परिसरात चमत्कार दाखविण्याचा बहाणा करून एका वृद्धाची सोन्याची अंगठी हातोहात लंपास करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील एका सराईत गुन्हेगाराला बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) जेरबंद केले आहे.

२८ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास हेळंब (ता. परळी) येथील रहिवासी असलेले वयोवृद्ध गणपत लक्ष्मण आंधळे हे परळी बसस्थानकात उभे होते. त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्या हातात एक दगडाचा खडा दिला आणि त्या खड्याचा रुद्राक्ष बनविण्याचा चमत्कार दाखविण्याचा बहाणा केला. याच दरम्यान या भामट्याने आंधळे यांच्या हातातील १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी चलाखीने चोरून नेली. या घटनेनंतर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २३२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

या गुन्ह्याचा तपास परळी शहर पोलीस आणि बीड स्थानिक गुन्हे शाखा समांतरपणे करत होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी तपास पथकाला हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पथकाने घटनास्थळाला भेट देऊन तेथील सीसीटीव्ही (C.C.T.V.) फुटेज तपासले. फिर्यादी गणपत आंधळे यांच्याकडून मिळालेले आरोपीच्या पेहरावाचे वर्णन, रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांची माहिती आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीवरून या गुन्ह्यातील आरोपी अफजल नवाब मदारी (वय २५ वर्षे, मूळ रा. लक्कडकोट, हल्ली मुक्काम सावरगाव, ता. येवला, जि. नाशिक) असल्याचे निष्पन्न झाले.

 

पोलिसांनी तातडीने येवला (नाशिक) येथे जाऊन आरोपीचा शोध घेतला व त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे या गुन्ह्याबाबत सखोल चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून चोरीला गेलेली अंदाजे १ लाख ७ हजार रुपये किमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी जप्त केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास आता परळी शहर पोलीस करत आहेत.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषीकेश शिंदे आणि पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या तपास पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, अंमलदार मारोती कांबळे, सचिन सानप, गोविंद भताने, सचिन आंधळे, चालक अतुल हराळे आणि विकी सुरवसे यांचा सहभाग होता.

Advertisement

Advertisement