Advertisement

'फ्रेंडशिप फाईल' म्हणजे लोकशाहीचा खून!

प्रजापत्र | Friday, 23/10/2026
बातमी शेअर करा

'फ्रेंडशिप फाईल' म्हणजे लोकशाहीचा खून! 

ऑडिओ क्लिपवरून राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नुकतीच एक ऑडिओ क्लिप उघड केल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या कथित ‘फ्रेंडशिप फाईल’ ऑडिओ क्लिपमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत जरांगे यांना ५०० कोटी रुपये पोहोचवल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. मराठा आंदोलन कमकुवत करण्यासाठी आणि आपली प्रतिमा मलिन करण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून राजकीय कट रचला जात असल्याचा गंभीर आरोप जरांगे यांनी केला असून, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या क्लिपची फॉरेन्सिक चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

 

या संपूर्ण प्रकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी या संभाषणाला 'लोकशाहीचा खून आणि बलात्कार' असे संबोधले आहे. राज ठाकरे यांनी निदर्शनास आणून दिले की, भाजपचे काही पदाधिकारी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते आणि काही युट्युबर्स यांच्यातील या संभाषणात केवळ ५०० कोटींच्या व्यवहाराचीच नव्हे, तर माध्यमांवर दबाव कसा आणावा आणि धार्मिक ध्रुवीकरणाद्वारे लोकांचे लक्ष कसे विचलित करावे, याचीही चर्चा आहे.

 

फॉरेन्सिक अहवालाच्या नावाखाली सरकारने केवळ वेळ मारून नेऊ नये, असा इशारा ठाकरे यांनी दिला आहे. ही क्लिप नेमकी बाहेर कशी आली आणि यामागे सत्ताधाऱ्यांमधील शह-काटशहाचे राजकारण तर नाही ना, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात निष्पक्ष कारवाई करून महाराष्ट्राला सत्य परिस्थिती सांगावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

Advertisement

Advertisement