Advertisement

अभिजीत दिपके यांना जामीन मंजूर

प्रजापत्र | Saturday, 17/10/2026
बातमी शेअर करा

दिल्ली पोलिसांनी शांतता भंगाच्या आरोपाखाली अटक केलेले 'कॉकरोच जनता पार्टी'चे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांना शनिवारी अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री कनॉट प्लेस येथील 'लहरा दो तिरंगा' रॅलीपूर्वी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. गेल्या आठ दिवसांतील ही त्यांची दुसरी अटक होती. दरम्यान, 'एसआयआर'च्या (SIR) मुद्द्यावरून १ नोव्हेंबर रोजी काँग्रेसने रामलीला मैदानावर महारॅलीचे आयोजन केले असून, दिल्ली पोलिसांनी या सभेसाठी पूर्वपरवानगी दिली आहे.

 

महिला संघटनांचा मोर्चा:आंदोलकांवरील पोलीस कारवाईच्या निषेधार्थ 'ऑल इंडिया वुमेन्स कल्चरल ऑर्गनायझेशन' आणि 'रिव्होल्युशनरी युथ ऑर्गनायझेशन'सह विविध संघटनांनी दिल्ली पोलीस मुख्यालयावर धडक मोर्चा काढला.

 

मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात हालचाली:सीजेपीच्या कायदेशीर प्रमुख रत्ना सिंग आणि वकील पुष्प शर्मा यांनी मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात उपस्थिती लावली. तिथे दिपके यांना उप-विभागीय कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर (SEM) हजर करण्यात आले. या पार्श्वभूमीवर ठाण्याबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात होता.

 

कडक नाकाबंदी:खबरदारीचा उपाय म्हणून दिल्लीतील कनॉट प्लेस, संसद मार्ग आणि जंतरमंतर परिसरात बॅरिकेड्स उभारण्यात आले, मात्र वाहतूक सुरळीत ठेवण्यात आली आहे.

 

कलम १६३ चे उल्लंघन:प्रतिबंधात्मक आदेश झुगारून गर्दी जमवल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी BNSS च्या कलम १६३ अंतर्गत अनेक गुन्हे नोंदवले आहेत.

 

दिल्ली पोलिसांवर केरळमध्ये 'झिरो एफआयआर' : १३ ऑक्टोबरच्या आंदोलनादरम्यान कनॉट प्लेस येथे पोलिसांनी गैरवर्तन, धक्काबुक्की व मारहाण केल्याचा आरोप करत दिल्ली विद्यापीठातील विधी शाखेची विद्यार्थिनी व एनएसयूआय (NSUI) कार्यकर्ती अथिरा विजयन हिने तिरुवनंतपुरममधील म्युझियम पोलीस ठाण्यात दिल्ली पोलिसांविरोधात 'झिरो एफआयआर' नोंदवला आहे.

 

प्रकाश राज यांचा इशारा:मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार व जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात देशभरात शांततापूर्ण मार्गाने आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे अभिनेते व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश राज यांनी स्पष्ट केले.

 

AISA चा पोलिसांवर आरोप:आयसा (AISA) अध्यक्षा नेहा बोरा यांना ताब्यात घेतल्यानंतर ५ तास वेगवेगळ्या ठिकाणी फिरवून अखेर आर. के. पुरम ठाण्यात ठेवण्यात आले. आजारी असतानाही औषधे नाकारण्यात आली आणि वकिलांसोबतच्या भेटीदरम्यान सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

 

सीजेपी प्रवक्ते तिहार तुरुंगात:१३ ऑक्टोबर रोजी जंतरमंतरवरून ताब्यात घेतलेले सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका आणि सौरव दास यांची ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी १८ ऑक्टोबरला संपणार असून, सध्या ते तिहार कारागृहात आहेत.

 

*राष्ट्रध्वजाच्या सन्मानाबाबत नियमावली:'लहरा दो तिरंगा' आंदोलनानंतर दिल्ली पोलिसांनी ध्वज संहितेबाबत जनजागृतीपर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यात तिरंग्याचा अवमान न करणे, कपडे किंवा सजावटीसाठी वापर न करणे आणि योग्य नियमांनुसारच राष्ट्रध्वज फडकवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Advertisement

Advertisement