Advertisement

मामेबहिणीशी बोलण्याच्या रागातून संभाजीनगरमध्ये १९ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या

प्रजापत्र | Thursday, 15/10/2026
बातमी शेअर करा

बीड : छत्रपती संभाजीनगरमधील गारखेडा परिसरातील साईनगर येथे एका १९ वर्षीय तरुणाची चाकू भोसकून निर्घृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. तौसिफ शमीम शेख असे या मृत तरुणाचे नाव आहे. तौसिफ आपल्या मामेबहिणीसोबत का बोलतो, या रागातून आदित्य शेळके याने हा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, पुंडलिकनगर पोलिसांनी पसार झालेल्या आरोपीला बीड येथून बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तौसिफ आणि आदित्य यांच्यात तौसिफच्या मामेबहिणीशी बोलण्यावरून मागील काही दिवसांपासून खटके उडत होते. यापूर्वीही त्यांच्यात याच कारणावरून बाचाबाची झाली होती. बुधवारी (१४ ऑक्टोबर) रात्री ११ वाजेच्या सुमारास तौसिफ दुचाकीवर बसून मोबाईल पाहत होता. याच वेळी आदित्यने त्याच्यावर चाकूने अचानक हल्ला चढवला. तौसिफच्या छातीवर, चेहऱ्यावर आणि डोक्यावर सपासप वार करण्यात आले.

 

अचानक झालेल्या या प्राणघातक हल्ल्यात तौसिफ रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. अत्यंत गंभीर अवस्थेत नातेवाईकांनी त्याला तातडीने एमजीएम रुग्णालयात हलवले. परंतु, शरीरातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे तौसिफच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 

या प्रकरणी तौसिफचा चुलत भाऊ मुजम्मील जमील शेख याने दिलेल्या फिर्यादीवरून पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात आदित्य शेळके विरोधात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले आणि सहायक पोलीस आयुक्त मनीष कल्याणकर यांनी घटनास्थळाला भेट दिली.

 

खून केल्यानंतर आरोपी आदित्य घटनास्थळावरून पसार झाला होता. मात्र, पुंडलिकनगर पोलिसांच्या पथकाने वेगाने चक्र फिरवत आरोपीचे लोकेशन शोधून काढले आणि बीडमध्ये कारवाई करत त्याला गजाआड केले. पोलीस निरीक्षक राजेंद्र मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, एका क्षुल्लक कारणावरून तरुणाचा बळी गेल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

Advertisement

Advertisement