आष्टी : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील पिंपळगाव घाट (अंभोरा पोलीस ठाण्याची हद्द) येथे एका २५ वर्षीय अज्ञात तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विहिरीच्या काठावर एक दुचाकी संशयास्पद स्थितीत आढळून आली असून, या तरुणाने आत्महत्या केली की त्याचा घातपात झाला, याचा तपास पोलीस करत आहेत.
शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस
पिंपळगाव घाट शिवारात एका विहिरीजवळ 'एम.एच. १६ ए.डब्ल्यू. ७४१४' (MH 16 AW 7414) या क्रमांकाची दुचाकी बऱ्याच वेळापासून उभी असल्याचे एका स्थानिक शेतकऱ्याला दिसले. संशय आल्याने त्याने जवळ जाऊन विहिरीत डोकावून पाहिले असता, एका तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. शेतकऱ्याने तात्काळ ही माहिती गावकऱ्यांना आणि अंभोरा पोलिसांना दिली.
गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह काढला बाहेर
घटनेची माहिती मिळताच अंभोरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विक्रांत हिंगे यांच्या सूचनेनुसार पोलीस हवालदार भरत माने आणि अमोल शिरसाठ यांनी घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांच्या मदतीने दोरीच्या साहाय्याने मृतदेह सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आला. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सुलेमान देवळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला आहे.
ओळख पटवण्याचे पोलिसांसमोर आव्हान
मयत तरुणाचे वय अंदाजे २५ वर्षे आहे. विहिरीकाठी सापडलेली दुचाकी अहमदनगर (अहिल्यानगर) पासिंगची असल्याने, सायबर आणि प्रादेशिक परिवहन (RTO) शाखेच्या मदतीने गाडीच्या मालकाचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तरुणाची ओळख पटल्यानंतर आणि शवविच्छेदन अहवाल हाती आल्यानंतरच या मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होईल. बेपत्ता तरुणाबाबत काही माहिती असल्यास अंभोरा पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

