Advertisement

बीड दि.८ (प्रतिनिधी)-जिल्ह्यात दुष्काळाने गंभीर स्वरूप धारण केलेले आहे.शेतकऱ्यांची पिके तर गेली आहेतच,मात्र रब्बीच्या देखील अपेक्षा उरलेल्या नाहीत. अशावेळी बीड जिल्ह्याला वाली कोण असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे.बीडच्या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री असलेल्या सुनेत्रा पवारांनी धावती भेट दिली होती,तर शिवसेनेचे संपर्क मंत्री असलेले भरत गोगावले जिल्ह्यात आलेच नाहीत.आता उद्यापासून केंद्रीय पथक दुष्काळाची पाहणी करणार आहे.मात्र या पथकाचा दौरा देखील राष्ट्रीय महामार्गालगतच्या गावांमध्येच ठेवण्यात आला आहे.बीड जिल्ह्यात महामार्गालगतच्या ६ गावांना भेटी देऊन हे पथक निघून जाणार आहे.त्यामुळे आता पाहणीच्या नावावर पुन्हा जिल्ह्याची चेष्टा होऊ नये इतकीच अपेक्षा आहे.

  बीड जिल्ह्यात यावेळी १९७२ ची आठवण यावी अशी दुष्काळी परिस्थिती आहे.जिल्ह्यात पावसाची तूट जवळपास ६० % इतकी आहे.त्यामुळे सप्टेंबर महिन्यापासूनच जिल्ह्यात टँकर सुरु झाले आहेत.तलावातील पाण्याने तळ गाठला आहे,भूजल पातळी खालावली आहे.चारा कागदावर दिसत असला तरी प्रत्यक्षात आकडेवारीत मोठी तफावत आहे.शेतकऱ्याचे पीक गेले,त्यामुळे त्याच्याकडे पैसा नाही,शेतमजुरांच्या आणि कामगारांच्या हाताला काम नाही त्यामुळे त्यांच्यासमोर जगण्याचा प्रश्न आहेच.अशावेळी खरेतर सरकारकडून पालकत्वाच्या मायेची अपेक्षा आहे,मात्र जिल्ह्यात त्याचाही दुष्काळ जाणवत आहे.

मुख्यमंत्र्यांनी सर्व पालकमंत्र्यांना दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्याचे आदेश दिले,त्यानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री असलेल्या पालकमंत्री सुनेत्रा पवारांनी जिल्ह्यात धावती भेट देत चार-दोन गावात पाहणी करून पुढे प्रशासनावर सारे काही सोडून मुंबई गाठली,शिवसेनेने संपर्क मंत्री म्हणून नेमलेले भरत गोगावले तर आले नाहीत.त्यांच्याकडे रोजगार हमी योजना खाते आहे,त्यांच्या खात्याच्या माध्यमातून दुष्काळात मोठी मदत होऊ शकते,मात्र राजकीय संपर्कात आघाडीवर असणारे गोगावले दुष्काळी संपर्कात कमी पडले आहेत.नाही म्हणायला पंकजा मुंडेंनी तब्बल ३ दिवस शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. लोकप्रतिनिधी म्हणून आ.धनंजय मुंडे,आ.सुरेश धस,आ.विजयसिंह पंडित,आ.नमिता मुंदडा यांनी काही भागात पाहणी केली.आता सारे काही प्रशासनभरोसे आहे.

अशा पार्श्वभूमीवर केंद्राचे दुष्काळ पाहणी पथक बीड जिल्हात येत आहे.या पथकाने तरी अगदी दुर्गम भागात जाऊन दुष्काळाची पाहणी करावी,खऱ्या अर्थाने येथील विदारकता पाहावी असे अपेक्षित असताना या पथकाचा बीड जिल्ह्यातील दौरा देखील राष्ट्रीय महामार्गालगतच्या गावांपासून बाजूला जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.दोन दिवस हे पथक जिल्ह्यात असले तरी या दोन दिवसात पहिला दिवस छत्रपती संभाजीनगरहून येताना राष्ट्रीय महामार्गावरची गेवराई तालुक्यातील २ गावे आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा राष्ट्रीय महामार्गावरची बीड आणि पाटोदा तालुक्यातील ४ गावे अश्या ६ गावांना भेटी,जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक आणि छत्रपती संभाजीनगरला रवाना होणार आहे.

--

पथकात कोण ?

केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकात सह सचिव मुकुंद अग्रवाल,उपसंचालक सुनीलकुमार दुबे,नीती आयोगाचे सल्लगार डॉ.जसपालसिंह आणि पशुसंवर्धन विभागाच्या डॉ.साक्षी भदोरिया यांचा समावेश असून छत्रपती संभाजीनगर विभागाचे सहायक कृषी संचालक नोडल अधिकारी राहणार आहेत.

---

येथे होणार पथकाच्या भेटी

पथक ९ तारखेला छत्रपतीसंभाजीनगरहून बीडकडे येताना अर्धमसला,पारगाव जप्ती येथे पाहणी करणार आहे.तर १० तारखेला मांजरसुम्भा,खंडाळा, वैद्यकिन्ही, सोनेगाव येथे भेटी देऊन दुपारी १२ वाजता जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन नंतर छत्रपती संभाजीनगरकडे निघणार आहे.

--

लोकप्रतिनिधींपेक्षा अधिकारीच जास्त बांधावर

बीड जिल्ह्यात भरपूर लोकप्रतिनिधी असले तरी त्यांच्यापेक्षा दुष्काळ पाहणीत प्रशासकीय अधिकारीच जास्त फिरल्याचे चित्र आहे.बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः जिल्ह्याच्या बहुतांश भागात भेटी दिल्या.सरकारी निकषामुळे का असेना एका पीक कंपनी प्रयोगाला हजेरी लावली, काही गावातील शेतीचे नुकसान पाहिले,काही सिंचन प्रकल्प पाहिले,जोडीला शाळेत जाऊन धडे दिले,रुग्णालयाची पाहणी केली,विभागीय आयुक्तांनी देखील जिल्ह्यात पाहणी केली, जिल्हापरिषदेचे मुक्या कार्यकारी अधिकारी देखील आयुक्तांच्या दौऱ्यात होतेच.त्यामुळे आता जिल्ह्यात सारे काही प्रशासनाच्याच भरोशावर चालवायचे असे कदाचित सरकारने ठरवले असावे.

Advertisement

Advertisement