Advertisement

वीजपुरवठ्यावरून दोन गावांत वाद चिघळला

प्रजापत्र | Monday, 14/09/2026
बातमी शेअर करा

 परळी : पांगरी येथील ३३ केव्ही सबस्टेशनमधून होणाऱ्या वीजपुरवठ्यावरून पांगरी आणि तळेगाव या दोन गावांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला आहे. वीजपुरवठा खंडित केल्याच्या निषेधार्थ दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी परळी-बीड राष्ट्रीय महामार्गावर वेगवेगळे रस्ता रोको आंदोलन केले. यामुळे महामार्गावरील वाहतूक बराच काळ ठप्प झाली होती.

      तळेगावचा वीजपुरवठा पांगरी ३३ केव्ही सबस्टेशनमधून येणाऱ्या स्वतंत्र फिटरद्वारे केला जातो. मात्र, अज्ञात व्यक्तींनी रविवारी सकाळी या फिटरच्या तारा काढून आणि विद्युत खांब तोडून वीजपुरवठा खंडित केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. गेल्या दोन दिवसांपासून गाव अंधारात असून शेतीसाठी पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या तळेगावच्या ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी ९ ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत परळी-बीड राष्ट्रीय महामार्गावर साडेतीन तास ठिय्या आंदोलन केले. स्वतःच्या गावातील शेतीसाठी वीज मिळावी म्हणून पांगरीतील काही व्यक्तींनी हा प्रकार केल्याचा आणि हुकूमशाही सुरू असल्याचा आरोप तळेगावच्या सरपंचांनी केला आहे.या प्रकरणी महावितरण व परळी ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.दुसरीकडे, पांगरी (गोपीनाथ गड) येथील ३३ केव्ही सबस्टेशन १३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजल्यापासून बंद असल्याने पांगरीसह परिसरातील अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. गणेशोत्सवाच्या काळातच ३३ केव्ही वीजवाहिनीवर एका व्यक्तीने मुद्दाम बिघाड केल्याचा आरोप करत पांगरीचे ग्रामस्थही रस्त्यावर उतरले. त्यांनी सकाळी १०.३० ते १२.४५ दरम्यान रस्ता रोको आंदोलन करत दोषींवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.

 

Advertisement

Advertisement