Advertisement

सुरेश भिसे यांच्यापासून जीवितास धोका

प्रजापत्र | Monday, 24/08/2026
बातमी शेअर करा

धाराशिव दि.24(प्रतिनिधी): तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथील सुरेश बाबुराव भिसे व त्यांच्या समर्थकांकडून माझ्यासह कुटुंबीयांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून, भिसे यांच्यावर तडीपारीची कारवाई करावी आणि मला पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे काक्रंबा जिल्हा परिषद मतदारसंघाचे सदस्य दयानंद मनोहर शिंदे यांनी केली. याबाबत त्यांनी सोमवारी (दि. २४) तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले.

शिंदे म्हणाले की, जिल्हा परिषद निवडणुकीच्या काळात सुरेश भिसे यांनी मला काक्रंबा मतदारसंघातून निवडणूक लढवू नये, अशी धमकी दिली होती. मात्र, आपण त्याच मतदारसंघातून निवडणूक लढवून विजयी झाल्याने भिसे यांना  हा विजय अद्याप पचलेला दिसत नसून,ते  सातत्याने माझ्याशी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत  असल्याचा आरोप शिंदे यांनी केला.

दि. २१ ऑगस्ट रोजी भिसे यांनी फोनवरून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा शिंदे यांनी केला. त्यानंतर दुपारी सुमारे १२ ते १२.३० वाजण्याच्या दरम्यान भिसे हे फॉर्च्युनर वाहनातून २० ते २५ समर्थकांसह आपण राहत असलेल्या मसला (खुर्द) येथे आले होते, असा आरोपही दयानंद शिंदे यांनी  केला.

भिसे व त्यांच्या समर्थकांकडे तलवारीसह इतर शस्त्रे असल्याचा आरोप करत शिंदे यांनी परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले. धमकी, दबाव आणि इतर गैरप्रकारांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, संबंधित प्रकरणांची सखोल चौकशी करून कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यांचा गैरवापर केल्याचा आरोप
काक्रंबा व परिसरात दबाव निर्माण करण्यासाठी भिसे आणि त्यांच्या सहकाऱ्याकडून अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचा गैरवापर करून काही व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आल्याचा गंभीर आरोपही शिंदे यांनी केला. संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल केल्यानंतर त्यांच्याशी तडजोड करून गुन्हे मागे घेण्याचा प्रकार केला जात असल्याचा दावाही त्यांनी केला.

भिसे व त्यांच्या समर्थकांकडून अवैध मार्गाने पैसा मिळविला जात असल्याचे तसेच विनापरवाना धारदार शस्त्रांचा वापर करून दहशत निर्माण केली जात असल्याचे आरोप करत, या सर्व बाबींची पोलिस प्रशासनाने सखोल चौकशी करावी, अशी मागणी शिंदे यांनी केली.

Advertisement

Advertisement