धाराशिव दि.१९(प्रतिनिधी): जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात आज मोठी घडामोड होणार असून ज्येष्ठ नेते संजय निंबाळकर,रामेश्वर शेटे हे आपल्या समर्थकांसह उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार आहेत. मुंबईतील ‘मातोश्री’ येथे हा पक्षप्रवेश होणार असून त्यासाठी शेकडो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी दिली.
संजय निंबाळकर हे जिल्ह्यातील ज्येष्ठ व अनुभवी नेते म्हणून परिचित आहेत. विविध सामाजिक व राजकीय उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यात आपला जनसंपर्क निर्माण केला आहे. त्यांच्यासोबत भाजपचे नेते रामेश्वर शेटे हेही ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याने या पक्षप्रवेशाकडे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.या दोन्ही नेत्यांसोबत त्यांच्या समर्थकांचीही मोठ्या संख्येने ठाकरे गटात प्रवेश करण्याची तयारी असून, शेकडो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाल्याचे सांगण्यात आले.त्यामुळे या पक्षप्रवेशामुळे आगामी काळात जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला या प्रवेशामुळे बळ मिळणार असून,स्थानिक पातळीवर पक्षाची ताकद वाढण्यास मदत होईल, असा दावा जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी केला.दरम्यान, ‘मातोश्री’ वर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या पक्षप्रवेशावेळी जिल्ह्यातील पदाधिकारी,कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या प्रवेशानंतर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना आणखी वेग येण्याची शक्यता आहे.

