केज दि.१८(प्रतिनिधी): तालुक्यातील तांबवा येथील एका सुशिक्षित तरुणाला महसूल विभागात थेट लिपिक पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून, परभणी जिल्हा न्यायालयात स्वतः लिपिक पदावर कार्यरत असलेल्या सख्ख्या मामानेच भाच्याला तब्बल १९ लाख रुपयांचा गंडा घातला आहे. नोकरी तर मिळलीच नाही तर हक्काचे पैसे देखील बुडाल्याने हताश झालेल्या भाच्याच्या अधिकृत फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गंभीर फसवणूक प्रकरणाची सविस्तर पार्श्वभूमी अशी की, केज तालुक्यातील तांबवा येथील रहिवासी अमोल मधुकर चिगुरे या तरुणाचे सख्खे मामा दगडू विठ्ठलराव हंगरगे (मूळ रा. माऊली नगर, जलालपूर रोड, परळी वैजनाथ, ह. मु. पालम, जि. परभणी) हे परभणी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात लिपिक म्हणून सरकारी सेवेत आहेत. प्रतिष्ठित पदावर असल्याचा फायदा घेत मामाने भाच्याला विश्वासात घेतले आणि महसूल विभागात लिपिक किंवा महसूल सहाय्यक पदावर थेट नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. या बदल्यात त्यांनी १९ लाख रुपयांची आग्रही मागणी केली. मामावर पूर्ण विश्वास ठेवून अमोल चिगुरे यांनी ७ जून २०२२ व ५ जुलै २०२२ दरम्यान केज येथील भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) शाखेतून आरटीजीएस द्वारे ऑनलाइन पद्धतीने मोठी रक्कम पाठवली, तसेच ८ जानेवारी २०२३ रोजी उर्वरित रक्कम राहत्या घरी नगदी रोख स्वरूपात मामाच्या हवाली केली होती.अमोल चिगुरे यांनी हक्काचे एकूण १९ लाख रुपये देऊन आज तब्बल तीन वर्षांचा प्रदीर्घ कालावधी उलटून गेला. मात्र, वारंवार विचारणा करूनही नोकरी संदर्भात कोणतीही हालचाल झाली नाही. अमोल यांनी जेव्हा जेव्हा परभणी गाठून मामा दगडू हंगरगे यांना नोकरीबद्दल जाब विचारला, तेव्हा तेव्हा मामाने विविध प्रशासकीय कारणांची ढाल पुढे करत भाच्याला खोटे आश्वासन देऊन केवळ वेळकाढूपणा केला. अखेर सख्ख्या मामानेच आपली फसवणूक केल्याचे अमोल यांच्या लक्षात आले. त्यांनी नोकरी नको पण आमचे हक्काचे पैसे तरी परत द्या, अशी आग्रही मागणी लावून धरली. मात्र, मामाने पैसे देण्यासही साफ नकार देत हात झटकले.आपली सर्व मार्गांनी फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अमोल मधुकर चिगुरे यांनी थेट केज पोलीस ठाणे गाठले. त्यांनी शुक्रवारी दिलेल्या लेखी फिर्यादीवरून संशयित आरोपी मामा दगडू विठ्ठलराव हंगरगे याच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम या प्रकरणाचा पुढील कायदेशीर तपास करत आहेत.

