Advertisement

'जलजीवन'च्या नवीन धोरणाचा फटका , जिल्ह्यातील दोनशेहून अधिक योजनांना स्थगिती    

प्रजापत्र | Thursday, 16/07/2026
बातमी शेअर करा

बीड दि. १५ (प्रतिनिधी ): राज्य सरकारने राज्यातील जलजीवन अभियानाच्या संदर्भाने नवीन धोरण निश्चित केले आहे. यात केंद्र आणि राज्याच्या नाडीच्या वाट्यापासून ते योजनांच्या मंजुरी आणि कार्यान्वयन आदी सर्वच पातळ्यांवर बदल करण्यात आले आहेत. मात्र याचा मोठा फटका बीड जिल्ह्यातील योजनांना बसणार आहे. जिल्ह्यातील नवीन आणि दुरुस्ती (रेट्रोफिटिंग ) अशा एकत्रित दोनशेहून अधिक योजनांना स्थगिती द्यावी लागणार आहे. तसे आदेश नुकतेच राज्य पाणी व स्वछता मिशनचे अभियान संचालक गंगाथरण डी. यांनी दिले आहेत.
    राज्यात जलजीवन योजनेचे नवीन धोरण शासनाने नुकतेच १० जुलै रोजी जाहीर केले आहे. यात केंद्राकडून निधी मिळाला नाही तरी हाती घेण्यात आलेल्या काही योजनांना राज्याच्या माध्यमातून निधीची तरतूद करण्यात येणार आहे. सध्या हाती घेण्यात आलेल्या योजना अगोदर पूर्ण करण्याच्या दृष्टीने हे नियोजन करण्यात येत आहे. मात्र हे करतानाच ज्या नवीन योजनांची कामे २५ % पेक्षा कमी झालेली आहेत, किंवा ज्या जुन्या रेट्रोफिटिंगच्या योजनांमध्ये ५० % पेक्षा कमी काम झाले आहे अशा योजनांना तात्काळ आहे तशी स्थगिती देण्याचे धोरण ठरविण्यात आले आहे.राज्य शासनाच्या या निर्णयानंतर राज्याच्या पाणी व स्वच्छता मिशनचे अभियान संचालक गंगाथरण डी. यांनी तातडीने सर्व जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना यासंदर्भाने निर्देश दिले असून ज्या नवीन योजनांची कामे २५ टक्क्यांपेक्षा कमी आहेत आणि जुन्या योजनांमध्ये ५० % पेक्षा कमी काम झाले आहे त्या योजना स्थगित करण्यास सांगितले आहे. याचा फटका बीड जिल्ह्यातील ३२ नवीन आणि सुमारे १७३ रेट्रोफिटिंगच्या योजनांना बसणार आहे. आता त्या योजना स्थगित होणार असून त्यांचे भवितव्य राज्य शासनाच्या निर्णयावर अवलंबून असणार आहे.

 

कोणत्या तालुक्यात किती योजना होणार स्थगित ?
तालुका         रेट्रोफिटिंग   नवीन
अंबाजोगाई      १८           ०६
आष्टी             १५           ०५
बीड                १३           ०३
धारूर             ०९            ---
गेवराई           ३३            ०३
केज               २२            ०६
माजलगाव      १३           ०३
परळी             १६         ०३
पाटोदा           १२  ,         ०१
शिरूर            १०           ०२
वडवणी          ०५          --

 

या नवीन योजनांना ब्रेक
पूस , तेलघाणा ,वाकडी , छोटेवाडी , सनगाव ,लिंबगाव ,पिंपरी (आष्टी ) , लमाणतांडा (वाघळूज ), जामगाव ,बावी ,आष्टा हरिनारायण ,मुर्शदपूर(राजुरी ) ,हिंगणी (खुर्द ),कराळवाडी ,शहाजानपूर चकला ,बोरगाव (बु ), गुंतेगाव ,बेलगाव ,भोपला ,केवड,सुकळी ,सोनेसांगवी ,घळाटवाडी ,काळेगावथडी,नित्रुड ,नागदरा,डाबी ,अमळनेर ,पिंपळनेर ,सावरगाव चकला

Advertisement

Advertisement