केज दि.१३(प्रतिनिधी): आडस-पिसेगाव-केज रस्त्यावरील उंदरी जवळील धोकादायक वळणावर रिक्षा पलटी होऊन घडलेल्या अपघातात एक जण ठार तर दोघे जखमी झाल्याची घटना रविवार (दि.१२) रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
मयत नारायण चांदणे रा. आडस, ता.केज मुलीला केज येथे सोडण्यासाठी कुटुंबासह रिक्षाने जात होते. दरम्यान ते आडस-केज मार्गावरील उंदरी गावाजवळ आले असता येथे एक धोकादायक वळण आहे. या वळणावर रिक्षा चालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षा पलटी होऊन अपघात घडला आहे. या अपघातात नारायण चांदणे यांना गंभीर मार लागला होता, तर त्यांची पत्नी कुसुम चांदणे आणि मुलगी ऋतुजा चांदणे हे जखमी झाले. तिघांनाही तातडीने अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र नारायण चांदणे यांचा मृत्यु झाला. तर जखमी आई व मुलीवर उपचार सुरू आहेत. आज सकाळी नारायण चांदणे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा
