Advertisement

बीड-अधिकार पदावर असताना आपले कनिष्ठ अधिकारी आणि कर्मचार्‍यांसोबत स्नेहाचे नाते निर्माण करता आले तर तो स्नेह विसरू म्हणता विसरता येत नाही हेच जी श्रीधर यांच्याबाबतीत पाहायला मिळाले. पूर्वी बीडचे पोलीस अधीक्षक म्हणून काम केलेले जी.श्रीधर आता उपमहानिरीक्षक
म्हणून पोलिसांच्या दळणवळण विभागाची सूत्रे सांभाळत आहेत. खूप वर्षानंतर ते बीडमध्ये आले होते, त्यावेळी त्यांना भेटण्यासाठी अधिकारी आणि कर्मचार्‍यांची मोठी गर्दी झाली आणि जी श्रीधर देखील प्रत्येकाला तितक्याच आपुलकीने भेटत राहिले.स्नेह आणि प्रेमाचा हा वेगळाच सोहळा बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाने अनुभवला.
पोलीस दल हे तसे शिस्तीचे खाते.येथे वरिष्ठ-कनिष्ठ अधिकारी हा भेद तर अधिकच असतो.शिस्तीसाठी,कधी कर्तव्य पालनासाठी खालच्या अधिकारी, कर्मचार्‍याला कडक बोलणारे अधिकारी पोलीस खात्यात नेहमीचेच.मात्र हे करत असताना देखील आपल्या टीममधील अधिकारी आणि कर्मचार्‍यांसोबत ‘कुटुंब’ म्हणून पालकत्वाची भावना जपणारे तसे मोजकेच.बीडला यापूर्वी पोलीस अधीक्षक म्हणून असलेले जी श्रीधर हे त्यापैकीच एक.तपासात उत्कृष्ठ अधिकारी, क्रिकेटची आवड,कायदा सुव्यवस्थेत त्यांचा हातखंडा आणि त्यांचे जिल्ह्यातील अधिकारी कर्मचार्‍यांशी संबंध देखील तितकेच आपलेपणाचे राहिलेले.  माध्यमे, लोकप्रतिनिधी,सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी देखील त्यांची ‘ट्युनिंग’ चांगली जुळलेली होती.म्हणूनच ते अमरावती, नागपूर भागात असताना बीडहून तिकडे जाणारे लोक त्यांना आवर्जून भेटायचे.
तेच जी श्रीधर शनिवारी बीडला आले होते. डीपआय प्रकल्पाच्या आढाव्यासाठी ते बीडला आल्याचे कळताच त्यांच्यासोबत काम केलेले अधिकारी आणि कर्मचार्‍यांना जणू प्रेमाचे भरते आले.अनेकांनी त्यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. पोलीस दलाची ‘व्हाईस’ म्हणून काम करणार्‍या संघटनेच्या दुबाले यांच्या निवासस्थानीही त्यांनी बोलविल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता भेट देवून स्वागत स्विकारले. भेटणार्‍या प्रत्येकाची त्यांनीही आवर्जून विचारपूस केली.कोण कुठे आहे,कोणाचे काय चालले आहे याची विचारपूस झाली.अधिकारी म्हटले की बदली होणारच, मात्र जेथे काम केले तेथे जर प्रेम आणि स्नेहाचा ओलावा मागे ठेवलेला असेल आणि नियमात राहून पालकत्वाच्या,संघनायकाच्या भूमिकेतून आपल्या कर्मचार्‍यांचे ‘कल्याण’ केलेले असेल तर स्नेह आणि प्रेमाची ओढ कितीही वर्षांनी कायम राहते हेच यातून पाहायला आणि अनुभवायला मिळाले.

 

Advertisement

Advertisement