केज- तालुक्यातील टाकळी येथील रहिवाशी असलेल्या विलास घुले या तरुणाचा खुन करण्यात आल्यानंतर या प्रकरणातील 9 आरोपींना बीड पोलीसांनी अटक केली होती. या प्रकरणाचा तपास केजचे उपविभागीय पोलीस अधिकारी एम वेंकटराम यांच्याकडून सुरू असून ते एसआयटीचेही प्रमुख आहेत. रविवारी घुले खून प्रकरणाची व्याप्ती वाढली असून दहाव्या आरोपीला केज पोलीसांनी लातूरमधून ताब्यात घेतले आहे.
विलास घुलेच्या हत्येमुळे राज्यभरात वातावरण ढवळून निघाले आहे. घुलेच्या न्यायासाठी पावसाळी अधिवेशनात आ.धनंजय मुंडे आणि आ.नमिता मुंदडा यांनी आवाज उठवत गुन्ह्याचा सखोल तपास करत आरोपीच्या अटकेची मागणी केली होती. पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी या घटनेत स्वत: लक्ष घालून 9 आरोपींना ताब्यात घेतले आहे तर पुरवणी जबाबात खा.बजरंग सोनवणे यांच्या मुलाचे नाव आल्यानंतर त्याला शनिवारी एसआयटीने चार तास चौकशीसाठी बोलावले होते. त्याचीही चौकशी सुरू झाली असून रविवारी घुले खून प्रकरणात आरोपी झालेल्या दहाव्या इसमाला केज पोलीसांनी लातूरमधून अटक केली आहे. राजकुमार मोरे (रा.सोनीजवळा) असे त्या आरोपीचे नाव असून त्याची सध्या पोलीसांकडून कसून चौकशी सुरू आहे. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचीही माहिती आहे.
गुन्ह्यातील स्कॉर्पिओ जप्त
विलास घुलेच्या खून प्रकरणात वापरण्यात आलेली स्कॉर्पिओ (एमएच44 झेड 9542) केज पोलीसांनी जप्त केली आहे. या कारचा घुलेच्या खूनात वापर झाल्याने सध्या ती केज पोलीसांच्या ताब्यात असल्याचे कळते.

