Advertisement

धाराशिव दि.२०(प्रतिनिधी):पवन निंबाळकर आणि समद काझी यांच्या हत्ये प्रकरणाचा निकाल येण्यासाठी तब्बल सतरा वर्षांचा कालावधी लागला. दीर्घ काळात आमच्या संपूर्ण कुटुंबाला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. आज न्याय मिळाला असला तरी या सतरा वर्षांत झालेल्या मानसिक वेदना आणि नुकसानाची भरपाई कोण करणार? असा भावनिक सवाल आमदार राणाजगजितसिंह पाटील त्यांनी उपस्थित केला आहे. डॉ. पद्मसिंह पाटील यांचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नसताना त्यांना केवळ राजकीय षडयंत्रातून मुद्दाम गोवण्यात आले आहे. काही राजकीय शक्तींनी हेतुपुरस्सर त्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी हे षडयंत्र रचल्याची प्रतिक्रिया आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत हा निकाल सत्याचा विजय असल्याचे म्हटले आहे. आज तब्बल १७ वर्षांनी जरी निकाल लागला असला तरी हा निकाल आपण आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांना सांगू शकत नाही आणि सांगितला तरी त्यांना तो समजण्याच्या परिस्थितीत नाहीत. ही आमच्या कुटुंबासाठी अत्यंत वेदनादायी बाब आहे, असल्याचेही आमदार पाटील यांनी नमूद केले. या संपूर्ण प्रकरणात सुरुवातीपासून डॉ. पद्मसिंह पाटील यांचा कोणताही संबंध नव्हता. त्यांना जाणीवपूर्वक या प्रकरणात गोवण्यात आले. हा केवळ गुन्हेगारी तपासाचा विषय नव्हता, तर त्यामागे मोठे राजकीय षडयंत्र असल्याचे सांगत डॉ. पद्मसिंह पाटील साहेबांच्या वाढत्या राजकीय प्रभावामुळे त्यांना लक्ष्य करण्यात आले. १९९० पासूनच त्यांच्याविरोधात काही शक्ती सक्रिय होत्या. २००९ मध्ये ते खासदार म्हणून निवडून आल्यानंतर आणि केंद्रातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर हे षडयंत्र अधिक तीव्र झाले. या कटात काही राजकीय व्यक्तींचा सहभाग होता, असे सूचक विधानही त्यांनी केले. मात्र, याबाबत सध्या अधिक भाष्य करणार नसून निकालाच्या आदेशाची प्रत वाचून झाल्यानंतर योग्य वेळी पुराव्यांसह संपूर्ण सत्य मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

खटल्याला लागलेल्या १७ वर्षांच्या कालावधीबाबतही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या काळात नेमका विलंब कोणी केला, कोणत्या कारणांमुळे न्यायालयीन प्रक्रिया लांबली, याबाबत सध्या बोलणे उचित ठरणार नाही; मात्र भविष्यात याविषयी सविस्तर माहिती देऊ, असे त्यांनी सांगितले. हे केवळ धाराशिव जिल्ह्याचे राजकारण नव्हते, तर महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंधित व्यापक घडामोडींचा भाग होता, असा दावाही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केला. न्यायालयाने या प्रकरणातील सर्व नऊ आरोपींना निर्दोष मुक्त केले असले, तरी पवनराजे निंबाळकर यांची हत्या नेमकी कोणी केली, त्यामागील कारणे काय होती आणि खरे आरोपी कोण आहेत, याचा निष्पक्ष व सखोल तपास होऊन दोषींना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

 

प्रकरणामागील कथित राजकीय षडयंत्र उघड करण्याचे संकेत

 या संपूर्ण प्रकरणात ज्यांनी राजकीय अथवा अन्य हेतूने षडयंत्र रचले, त्यांच्याविरोधात कायदेशीर आणि फौजदारी कारवाई करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही राणाजगजितसिंह पाटील यांनी स्पष्ट केले. खटल्यातील साक्षीदारांच्या जबाबांबाबत तसेच तत्कालीन तपास प्रक्रियेत वरिष्ठ पोलीस अधिकारी राकेश मारिया यांच्या भूमिकेबाबत न्यायालयाने काही महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदविल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, न्यायालयाच्या सविस्तर आदेशाचा अभ्यास केल्यानंतरच त्यावर अधिक सविस्तर माहिती देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा निकाल न्यायव्यवस्थेवरील विश्वास दृढ करणारा असल्याचे सांगत, आगामी काळात या प्रकरणामागील कथित राजकीय षडयंत्र उघड करण्याचे संकेतही दिले आहेत.

Advertisement

Advertisement