मुंबई : राज्यात १५ जूनपासून मान्सून सक्रिय होण्याची अपेक्षा होती. मात्र, मान्सूनने पुन्हा एकदा दिशा बदलल्याने त्याचे आगमन आणखी लांबले आहे. सध्या अरबी समुद्रातील मान्सूनची वाटचाल थांबली असून, अफगाणिस्तानकडून येणाऱ्या गरम आणि कोरड्या वाऱ्यांमुळे त्याच्या प्रगतीला अडथळा निर्माण झाला आहे. हे वारे कमी झाल्यानंतरच मान्सून पुढे सरकण्याची शक्यता असून, मुंबईसह महाराष्ट्रात तो आता २० जूनच्या सुमारास दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
यापूर्वी ११ जून, त्यानंतर १५ जून आणि आता थेट २० जून अशी मान्सून आगमनाची तारीख पुढे ढकलली गेल्याने शेतकरी वर्गात मोठी चिंता निर्माण झाली आहे. पावसाअभावी खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या असून, अनेक भागांतील जलसाठे आणि भूजल पातळीही झपाट्याने खाली जात आहे.
दरम्यान, यंदा एल निनोचा प्रभावही पावसावर पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाल्यामुळे राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडू शकतो, असा अंदाज भारतीय हवामान विभागासह विविध आंतरराष्ट्रीय हवामान संस्थांनी वर्तवला आहे. त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना अधिकृत आवाहन होईपर्यंत पेरणी न करण्याचा सल्ला दिला असून, त्यामुळे दुबार पेरणीचे संकट टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे.
सध्या राज्यात उष्णतेची तीव्रता वाढली असून, मान्सूनच्या प्रतीक्षेत नागरिक आणि शेतकरी दोघेही आहेत. हवामान तज्ज्ञांच्या मते, पुढील चार ते पाच दिवसांत मान्सून पुन्हा गती घेण्याची शक्यता असून, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये तो सक्रिय होऊ शकतो.

