मुंबई : नैऋत्य मान्सून महाराष्ट्रात दाखल होऊन चार दिवस झाले तरी पुढे सरकलेला नाही. कोकणात मान्सूनने ७ जूनला एन्ट्री केली. तरी तिथून पुढे मान्सूनची वाटचाल मंदावली आहे. संथ गतीने मान्सून पुढे सरकत असल्यानं महाराष्ट्र व्यापण्यासाठी अजून आठवड्याभराचा कालावधी लागू शकतो. हवामान विभागाने मराठवाड्यात १५ जून पर्यंत पाऊस वाढणार नसल्याचं सांगितलंय. ११ ते १८ जून या कालावधीत पावसाचा जोर कमी राहील असा अंदाज वर्तवलाय. १८ जून नंतर पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केलीय.
हवामान विभागाने वर्तवलेल्या पावसाच्या विस्तारित कालावधीतील अंदाजानुसार ११ ते१८ दरम्यान विशेषतः राज्याच्या अंतर्गत भागात पावसाची जोर कमी राहण्याची व मेघगर्जनेची शक्यता आहे. तर १८ जूनपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात राज्यात पावसाचे प्रमाण वाढू शकते व हे प्रमाण जूनच्या अखेरपर्यंत कायम राहील असा अंदाज आहे.मुंबईसह किनारपट्टीवर पुढील किमान एक आठवडा पावसाची कमी-अधिक तीव्रतेसह हजेरी कायम राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांमध्ये काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी पावसाच्या सरी पडण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवलीय.
यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस?
IMD च्या दीर्घकालीन अंदाजानुसार २०२६ मध्ये जून ते सप्टेंबर या मान्सून हंगामात देशात सरासरीच्या 90% म्हणजे 949 मिमी पाऊस होणार आहे. एल निनोचा प्रभाव असल्याने जून महिन्यात महाराष्ट्रात पावसाची कमतरता राहण्याची शक्यता आहे.
कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला
कृषी तज्ज्ञांच्या मते, शेतकऱ्यांनी आभाळ पाहून पेरणी न करता जमिनीत पुरेसा ओलावा झाल्यावरच पेरणी करावी. १५ जूननंतरचा पावसाचा अंदाज पाहूनच नियोजन करणे शेतकऱ्यांच्या हिताचे राहील.

