Advertisement

अविनाश पाठकचा जामीन फेटाळला 

प्रजापत्र | Sunday, 07/06/2026
बातमी शेअर करा

बीड दि. ६ (प्रतिनिधी ): मागच्या तारखेत भूसंपादन लवादाचा  निवाडा जाहीर करण्याच्या प्रकरणातील आरोपी असलेल्या सनदी अधिकारी अविनाश पाठकचा जामीन बीडच्या जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे. प्रभारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस आर शिंदे यांनी हा निर्णय दिला.
बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या भूसंपादन घोटाळा प्रकरणात पोलिसांनी ७ मे रोजी बीडचे माजी जिल्हाधिकारी राहिलेल्या सनदी अधिकारी अविनाश पाठकला अटक केली होती. या प्रकरणात पोलिसांना पाठकची ७  दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती, त्यानंतर अविनाश पाठक न्यायालयीन कोठडीत आहे. अविनाश पाठकने जामिनासाठी बीडच्या जिल्हा न्यायालयांत धाव घेतल्यानंतर त्याची सुनावणी प्रभारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस आर शिंदे यांच्यासमोर झाली. मागच्या तारखेत न्यायालयाने तपास अधिकाऱ्याला या प्रकरणातील लाभार्थी नेमके कोण आहेत, प्रत्येकाची संचिका कोणती आदी माहिती मागविली होती. त्यानुसार शनिवारी यात सुनावणी झाली. न्यायालयाने अविनाश पाठकच्या वतीने केलेले युक्तिवाद फेटाळले . तसेच या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असले तरी या प्रकरणाचा तपास आणखी सुरु आहे, अविनाश पाठक ने बीडमध्ये यापूर्वी विविध पदांवर काम केलेले असल्याने तो प्रभावशाली व्यक्ती असल्याचे सांगत अविनाश पाठकचा जमीन फेटाळला.

पोलिसांनी काय सांगितले
या अर्जाच्या सुनावणी दरम्यान पोलिसांनी आरोपी संजय हांगे आणि अविनाश पाठक यांच्यातील टेलिफोन कॉल चा वारंवार संदर्भ दिला आहे. तसेच ज्या प्रकरणात अगोदरच लवादाच्या निर्णय झाल्याचे सांगितले जाते, त्या प्रकरणात मे महिन्यात फाईलवर सही घेण्यासाठी आणखी एका संशयितांचा आणि संजय हणजेच संपर्क आणि संभाषण झाले आहे. विशेष म्हणजे संशयित, संजय हांगे आणि अविनाश पाठक यांचे लोकेशन एकत्र आहेत असा दावा करण्यात आला. या प्रकरणात न्यायालयाने योगिनी जाधव आणि डॉ. सोमनाथ शिंदे यांचे जबाब महत्वाचे मानत त्यावरून आपली निरीक्षणे नोंदवली आहेत.

 

संचिका गहाळ प्रकरणातील दावा फेटाळला
या प्रकरणातील काही संचिका गहाळ असून त्या आरोपी अविनाश पाठक च्या ताब्यात असण्याचा दावा पोलिसांनी केला होता, यावर समितीने आपण संपूर्ण १५४ संचिका तपासल्या असल्याचे पत्र पोलिसांना दिले आहे, त्यामुळे संचिका गहाळ असण्याचा प्रश्न उद्भवत नसल्याचे आरोपीच्या वतीने सांगण्यात आले, मात्र त्याच पत्रात सर्व संचिका प्रत्यक्ष पाहता आल्या नसल्याचे समितीच्या वतीने नोंदविण्यात आल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. तसेच आरोपीच्या वतीने ज्या संचिकांमध्ये बदलीपूर्वी मावेजा मागणीची कारवाई सुरु झाल्याचे सांगण्यात आले, त्या संचिका केवळ २० असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने जामीन फेटाळला

 

Advertisement

Advertisement