Advertisement

 डोक्याला बंदूक लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी धनंजय देशमुखवर गुन्हा 

प्रजापत्र | Sunday, 31/05/2026
बातमी शेअर करा

बीड दि.३१(प्रतिनिधी):मस्साजोगचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू असलेल्या धनंजय देशमुखवर बीडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोक्याला बंदूक लावून आपल्याला जीवे मारण्याच्या हेतूने धनंजय देशमुखने प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले असून याप्रकारामुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
    संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी धनंजय देशमुख यांनी तटस्थ भूमिका घेत भावाच्या न्यायासाठी रान उठवले होते. आपल्या भावाची झालेली निर्घृण हत्या माणुसकीला काळिमा फसणारी असून यातील दोषीवर कठोर कारवाई व्हावी आणि आरोपीच्या संबंधित गँगवर अनेक धक्कादायक आरोप धनंजय देशमुखच्या वतीने सतत सुरु होते. आता तर धनंजय देशमुखवरच जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ग्रामीण पोलिसांकडे समाधान खिंडकर (वय-३० व्यवसाय मजुरी रा. बेलवाडी) याने दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे मी माझे मिञ नामे दीपक रसाळ,योगेश मनेरी व  दीपकचा मिञ नाव माहीत नाही यांच्यासोबत माझे मोटारसायकलवर बसुन बीड बायपास रोडवरील हॉटेल शेतकरी येथे जेवणासाठी गेलो. यावेळी रिलस्टर रवीराज साबळे हे देखील त्यांच्यासोबत हॉटेल शेतकरी राजा येथे जेवण करण्यासाठी आलेला होता. मी माझे मोबाईलवरील इंन्स् टाग्रामवर रवीराज साबळे यांना लाइव्ह दाखवत असतांना माझे हातातुन धनंजय देशमुख यांच्या अंगरक्षकाने मोबाईल घेतला. तेव्हा मी त्यांना म्हणालो तुम्ही माझा फोन का घेतला असे म्हणताच धनंजय देशमुख हा पाठीमागुन पळत आला व मला म्हणाला की तु विनाकारण आमच्यासोबत वाकडयात घुसु नकोस माझ्याकडे एवढा पैसा आहे की मी चलत-चलत तुला संपवुन टाकीन असे म्हणुन त्याने त्याचे अंगरक्षकाचे कमरेची पिस्टल काढुन जिवे मारण्याचे उददेशाने माझे डोक्याला लावुन मला म्हणाला की तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. त्यानंतर मला शिवीगाळ करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.मात्र इतरांनी मध्यस्थी केल्याने यातील पुढील अनर्थ टाळला असून आता याप्रकरणात बीडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरुन 192/2026,कलम 109,352,351,(2),3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत असून या घटनेमुळे मात्र खळबळ उडाली आहे.

Advertisement

Advertisement