Advertisement

सरकारचं शिष्टमंडळ आज अंतरवालीत जाणार

प्रजापत्र | Friday, 29/05/2026
बातमी शेअर करा

जालना : सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उद्या (३० मे) पासून भर उन्हात उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे. या इशाऱ्यानंतर राज्य सरकारचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ आज दुपारी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे भेट देणार आहे. या भेटीपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत सरकारवर जोरदार टीका केली. 

   मनोज जरांगे पाटील म्हणाले की, उन्हात जाळून घेणे सोपं नाही. ही अग्निपरीक्षा आहे. सरकार मराठ्यांची अग्निपरीक्षा घेत आहे. ते एसीमध्ये बसतात. त्यांना या विषयाची मजा वाटते. पण, ही खूप मोठी अग्निपरीक्षा आहे. सरकारने आणि देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांची अग्निपरीक्षा घेतली नाही पाहिजे. याच मराठ्यांनी त्यांना सत्तेवर बसवलं आहे. मी मंडप, कुलर लाऊन उपोषणाला बसलो असतो, पण स्वतःला समाजासाठी भाजून घेत आहे. हे सरकारला कळत नाही का? मी नियमात बोलतो तर मी माघार का घेणार? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच, ताब्यात घेणे, अटक करणे, हल्ला करणे हे डोक्यात आणू नका, असा इशारा त्यांनी त्यावेळी दिलाय.  

Advertisement

Advertisement