अमरावती : सातनूर शेतशिवारात वास्तव्याला असलेल्या तीन सख्ख्या चिमुकल्या भावंडांचा पुसली धरणाच्या पात्रात बुडून मृत्यु झाल्याची घटना सोमवारी तीनच्या सुमारास उघडकीस आली. रविवारी दुपारनंतर घरून गेलेले हे तिघे उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्यांचा शोध सुरू होता. दरम्यान, पुसली धरणाच्या काठावर कपडे आढळून आल्याने धरणाच्या पात्रात त्यांचा शोध घेण्यात आला असता, या बालकांचे मृतदेह आढळून आले. तिघांनाही पोहता येत नसल्याने आंघोळीच्या नादात बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
पोलिस सूत्रानुसार, मृत पंकज संतुलाल उईके (१०), प्रिया संतुलाल उईके (८), पवन संतुलाल उईके (७), रा.सातनूर शेतशिवार निमकर यांचे शेत) असे नाव आहे. तिन्ही मृत भावंडं नागपूर जिल्ह्यातील नरखेड येथील आदिवासी आश्रम शाळेत शिक्षण घेत होते. उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी आले होते. आई अनिता आणि वडील संतुलाल हे शेतमजुरी आणि रखवालदारी करून उदरनिर्वाह करतात. रविवारी दुपारी एक वाजता घरून गेलेली चिमुकली रात्री उशिरापर्यंत परत न आल्याने त्यांचा शोध सुरू होता. सोमवारी शेतशिवारासह पुसली धरण परिसरात शोध घेतला असता, दुपारी अडीचच्या दरम्यान तिन्ही भावंडांचे कपडे धरणाच्या काठावर आढळून आल्याने याबाबत पोलिस स्टेशन शेंदरजनामात रोशे माहिती दिली. हे कुटुंब मूळचे मध्य प्रदेशातील घाना बिंद्रा (जि. छिंदवाडा) येथील रहिवासी असून, ते रोजगाराकरिता शेंदूरजनाघाट येथील मनोहर निमकर यांचे शेतात सातनूर येथे झोपडी करून राहतात. मुलांना पोहता येत नसल्याचे वडील संतुलाल उईके यांनी सांगितले. परंतु आंघोळीचा मोह आवरला नसल्याने धरणावर गेले व ही दुर्दैवी घटना घडली.ठाणेदार दीपक महाडिक यांनी पथकासह घटनास्थळ गाठले. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढून पंचनामा केला. वरूड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून रात्री सात वाजता मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिले.

