बीड दि.१४(प्रतिनिधी): शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून पुन्हा एका चार वर्षीय बालकावर कुत्र्यांच्या टोळक्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नगरपालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
बुधवार (दि.१३) रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शहरातील पंढरी नगरी परिसरात खेळत असताना एका चार वर्षीय बालकावर भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने अचानक हल्ला चढवला जवळच असलेल्या नागरिकांनी तात्काळ कुत्र्यांना हुसकून लावल्याने पुढील अनर्थ टळला. या हल्ल्यात बालक जखमी झाले असून त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.गेल्या काही महिन्यांपासून शहरातील पेठ बीड, बार्शी नाका, मोमीनपुरा, झमजम कॉलनी भागांत भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांना व बालकांना चावा घेण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. मात्र, एवढ्या घटना होऊनही नगरपालिका प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

