मुंबई : मागील काही दिवसांपासून देशासह राज्याच्या हवामानात बदल होत आहेत. राज्यातील काही भागात पावसाची नोंद होत आहे तर काही भागात कोरडे हवामान आहे. दरम्यान, शनिवारपर्यंत राज्यातील काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली असून यादरम्यान वादळी वाऱ्यांसह, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट यांसह पाऊस आणि गारपीटीचा अंदाजही हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे आज राज्यातील काही जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
राज्यात मागील काही दिवसांपूर्वी विशेषतः विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाटसदृश्य स्थिती नोंदली जात होती. यामुळे तापमानाचा पारा ४६ अशांवर पोहोचला होता. यादरम्यान नागरिकांना तीव्र उष्णतेचा त्रास सहज करावा लागत होता. मात्र, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अनेक भागातील कमाल तापमानात काहीशी घट झाली असून यामुळे नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. पुढील चार दिवसात राज्यातील कमाल तापमानात २ ते ३ अशांनी वाढ होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे पुन्हा उकाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.राज्यात सध्या मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाळी हवामान असून काही ठिकाणी पावसाची आणि गारपिटीची नोंद होत आहे. शनिवारपर्यंत या भागात पावसाची शक्यता आहे असून त्यांनतर हवामान कोरडे राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तर कोकण प्रदेशातही उष्ण आणि दमट वातावरणाची नोंद होत असून शनिवारपर्यंत हीच स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे. तर रत्नागिरी आणि सिधुदुर्ग आदी जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
आज ‘यलो अलर्ट’ कुठे ?
नांदेड, लातूर, बीड, हिंगोली, धाराशिव, सोलापूर, सातारा आणि सातारा घाट विभाग , सांगली, कोल्हापूर आणि कोल्हापूर घाट विभाग, तसेच कोकण प्रदेशातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली असून या भागांना गुरुवारी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. या दरम्यान ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहतील अशीही शक्यात असून तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यात हवामान विभागाने वर्तविली आहे. तर कोकण प्रदेशातील पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आदी भागात उष्ण आणि दमट वातावरण राहील, अशी शक्याताही हवामान विभागाने वर्तवली आहे.

