धाराशिव दि.३(प्रतिनिधी): कळंब शहरात काल दुपारी सुमारे २ च्या सुमारास वीज पुरवठा करणाऱ्या मुख्य ट्रान्सफॉर्मरला अचानक आग लागल्याने संपूर्ण शहराचा वीजपुरवठा खंडित झाला. आग भीषण स्वरूपाची असल्याने ती नियंत्रणात आणण्यासाठी तब्बल १६ तास लागू शकतात, असा अंदाज सुरुवातीला व्यक्त करण्यात येत होता. मात्र, स्थानिक आ.कैलास पाटील यांच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे परिस्थिती लवकर नियंत्रणात आणण्यात यश आले आणि शहराचा वीजपुरवठा अल्पावधीतच पूर्ववत करण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच आ.कैलास पाटील स्वतः घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ संबंधित यंत्रणेशी समन्वय साधत आग नियंत्रणासाठी आवश्यक साहित्य आणि मनुष्यबळ उपलब्ध करून दिले. तसेच पर्यायी व्यवस्था उभारून इतर ट्रान्सफॉर्मरच्या माध्यमातून शहराला वीजपुरवठा सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यांच्या या कार्यतत्परतेमुळे मोठा संभाव्य धोका टळला. दरम्यान आग इतकी मोठी होती की आग विझवण्यासाठी लोहारा आणि सोलापूर जिल्ह्यातील अग्निशमन दलाच्या गाड्या आ.पाटील यांनी फोन करून मागवल्या. त्यांच्या या तत्परतेमुळे आगीवर नियंत्रण तर मिळालेच मात्र अंधारात जाणाऱ्या कळंबला देखील उजेड देण्याचे काम आ.कैलास पाटील यांनी केलं. दरम्यान, सध्या सुरू असलेल्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठा खंडित राहिल्यास ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच रुग्णालयातील रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागला असता. याशिवाय, नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अडचणी निर्माण झाल्या असत्या. मात्र, वेळेवर करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे ही सर्व परिस्थिती टळली.या घटनेत काही विरोधक घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेत निघून गेल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात संकटाच्या वेळी प्रशासनाशी समन्वय साधत काम करून दाखवणारा लोकप्रतिनिधी कोण, याचा प्रत्यय नागरिकांना आला.कळंब शहरातील नागरिकांनी आ.कैलास पाटील यांच्या तत्परतेचे कौतुक करत त्यांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले आहे. संकटाच्या काळात वेगाने निर्णय घेऊन अंमलबजावणी केल्यास मोठे नुकसान टाळता येते, याचे हे उदाहरण असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.

प्रजापत्र | Sunday, 03/05/2026
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा
