Advertisement

  लातूरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी

प्रजापत्र | Tuesday, 21/04/2026
बातमी शेअर करा

 लातूर : जिल्ह्यात उन्हाचा (Heat) तडाखा दिवसेंदिवस वाढत असून, या भीषण उष्णतेने एका शेतकऱ्याचा (Farmer) बळी घेतल्याची हृदयद्रावक घटना निलंगा (Nilanga) तालुक्यातील औराद शहाजनी येथे घडली आहे. लक्ष्मण दादाराव भंडारे (वय ६०) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, उष्माघाताच्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
    सोमवारी दुपारी लक्ष्मण भंडारे हे आपल्या शेतात नेहमीप्रमाणे काम करत होते. गेल्या काही दिवसांपासून लातूर जिल्ह्याचे तापमान ४२ अंशांच्या पार गेले आहे. दुपारी कडाक्याच्या उन्हात काम करत असताना भंडारे हे अचानक जमिनीवर कोसळले. शेतात उपस्थित असलेल्या इतरांनी त्यांना तातडीने औराद येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी निलंगा येथे हलवण्याचा सल्ला दिला. दुर्दैवाने, निलंग्याला नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवसभर कडाक्याच्या उन्हात काम केल्यामुळे लक्ष्मण भंडारे यांच्या शरीरातील पाण्याची पातळी अत्यंत खालावली होती. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे (Dehydration) त्यांना उष्माघाताचा तीव्र झटका बसला, जो त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरला. मयत लक्ष्मण भंडारे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, पाच मुली, सून आणि नातू असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने भंडारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Advertisement

Advertisement