नागपूर : राज्यात सूर्याचा कहर सुरू असून विदर्भात सूर्य अक्षरशः आग ओकत असल्यासारखी स्थिती आहे. कमाल तापमानाचा पारा ४४ अंश सेल्सिअसपालिकडे गेला आहे. विदर्भात तीव्र उष्णता, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात उष्णता, तर कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचे संकट कायम आहे.
विदर्भात तीव्र उष्णतेची लाट असून पारा ४४ अंशांपलीकडे गेला आहे. विशेषतः अकोला, अमरावतीत उष्णतेचा कहर आहे. अकोल्यात बुधवारी अक्षरशः ४४.२ अंश सेल्सिअस तर अमरावती शहरात ४४ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले. अकोला सलग चौथ्या दिवशी भारतातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले. तर जगातही ते सर्वाधिक उष्ण ठरले. वर्धा, नागपूर या शहरात देखील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. आणखी काही दिवस वैदर्भीयांना हा ताप सहन करावा लागणार आहे.
राज्यातील इतर भागात स्थिती
राज्यातील बहुतांश भागात उष्णतेची लाट कायम आहे. विदर्भात तापमान ४४ अंश सेल्सिअस पलीकडे तर मराठवाड्यात देखील पारा ४३ अंशापालिकडे गेला आहे. १६ एप्रिलला राज्यातील १५ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. कोकणात उष्ण आणि दमट हवामान स्थिती कायम आहे. मुंबईसह संपूर्ण कोकणात आज पुन्हा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात देखील उष्णतेचा पारा चढला असून सूर्य आग ओकत असल्याचे चित्र आहे. पुण्यासह संपूर्ण मध्य महाराष्ट्रात हवामान मुख्यतः कोरडे राहील. सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत उष्णतेची लाट आहे. मराठवाड्यात देखील उष्णतेची लाट आहे. छत्रपती संभाजीनगरसह जालना, हिंगोली, परभणी आदी जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. उत्तर महाराष्ट्रात देखील उष्णतेचा पारा चढला आहे.
विदर्भात तापमानाचा उच्चांक
राज्यात एप्रिलच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावली होती, मात्र दुसऱ्या आठवड्यापासून उन्हाचा चटका असह्य झाला आहे. बुधवारी १५ एप्रिलला अकोल्यात ४४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे तापमान सलग दुसऱ्या दिवशी देशातील सर्वाधिक होते. अकोल्यापाठोपाठ अमरावती येथे ४४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. वर्धा ४३.९, नागपूर ४३.४, सोलापूर ४३.३, मालेगाव ४३.२ व बीड येथे ४३.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
सलग चार दिवसांपासून अकोला तापलेला
सलग चार दिवसांपासून अकोला देशातील सर्वाधिक तापमान असलेले शहर आहे. बुधवारी अमरावती देखील य यादीत आले. देशात सर्वाधिक तापमान असलेल्या पहिल्या दहा शहरांमध्ये सात शहरे महाराष्ट्रातील व या सात शहरांमध्ये चार शहरे विदर्भातील आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अक्षय तृतीयेपर्यंत ही उष्णतेची लाट कायम असणार आहे.

