Advertisement

 जिल्हा रुग्णालयाची औषध,साहित्य खरेदी निविदा वादाच्या भोवऱ्यात

प्रजापत्र | Friday, 10/04/2026
बातमी शेअर करा

 बीड दि.१० (प्रतिनिधी ) : बीड जिल्ह्यात मागच्या  काही काळात प्रशासकीय अधिकाऱ्यांवरच निविदा प्रक्रियेतून विशिष्ट वर्गाला फायदा देण्याचा प्रयत्न होत असल्याचे आरोप सातत्याने होत आहेत. त्यात आता जिल्हा रूग्णालयाची भर पडली आहे. बीडच्या जिल्हा रुग्णालयात औषधी आणि साहित्य खरेदीसाठी नियोजन समितीच्या निधीतून निविदा मागविण्यात आल्या आहेत. या निविदेच्या अटी शर्ती मुद्दाम यात सर्वांना सहभागी होता येऊ नये आणि मोजक्याच लोकांच्या हाती ही सारी प्रक्रिया राहावी अशा तयार करण्यात आल्याचा आरोप आता आ. विजयसिंह पंडित यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असून निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली आहे.
    बीड जिल्हा रुग्णालयात नियोजन समितीच्या निधीतून औषधे आणि साहित्य खरेदीसाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून त्याची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र सादर निविदा प्रसिद्ध करताना जाणीवपूर्वक राज्यात कोठेच नाहीत असे नियम लावण्यात आले आहेत. सर्वसाधारणपणे ज्या कंपन्या किंवा वितरक वर्षानुवर्षे पुरवठा करतात त्यांना निविदा भारत येऊ नयेत आणि काही मोजक्याच लोकांना या निविदेचा लाभ घेता यावा असे नियम मुद्दाम लावण्यात आले असल्याचे आ. विजयसिंह पंडित यांनी म्हटले आहे. बयाना रक्कम, सांगण्यात आलेली नाही,  अंदाजित किंमत आणि एकूण निविदा रक्कम याचा देखील उल्लेख केलेला नाही ,लहान पुरवठादारानी यात सहभागीच होऊ नये अशी परिस्थती निर्माण करण्यात आली आहे, विशेष म्हणजे ज्याला सहभागी व्हायचे आहे त्याने सर्वच घटक पुरविणे बंधनकारक करण्यात आले आहे असे आरोप करण्यात आले असून हि सारी प्रक्रिया रद्द करण्याची मागणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.
 

विशिष्ट अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून प्रक्रिया
जिल्हा रुग्णालयात यापूर्वी शास्त्रक्रियागृहाचे काम करताना देखील अशाच  विचित्र अटी टाकण्यात आल्या होत्या. प्रशासनातील काही विशिष्ट अधिकाऱ्यांनी त्यांच्या मर्जीतल्या व्यक्तीला काम मिळावे त्यासाठी त्या अटी सांगितल्या आणि रुग्णालय प्रशासनाने त्या अधिकाऱ्याच्या सांगण्यावर ताशा अटी टाकल्या होत्या, याचाही उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे.

 

Advertisement

Advertisement