Advertisement

शांतिवन येथे ४५ वे मराठवाडा साहित्य संमेलनाचे आयोजन 

प्रजापत्र | Sunday, 05/04/2026
बातमी शेअर करा

 शिरूर कासार दि.५(प्रतिनिधी): भवानी विद्यार्थी कल्याण प्रतिष्ठान,शांतीवन यांच्या वतीने आयोजित मराठवाडा साहित्य परिषदेचे ४५ वे मराठवाडा साहित्य संमेलन शुक्रवार व शनिवार दि.१० व ११ एप्रिल २०२६ रोजी शांतीवन आर्वी येथे संपन्न होणार आहे.अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष जेष्ठ समाजसेवक दिपक नागरगोजे यांनी रविवार (दि.५) रोजी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी साहित्यीक भास्कर बडे व डॉ. विठ्ठल जाधव यांची उपस्थिती होती.

     ४५ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान सुप्रसिद्ध कवी प्रा. फ. म. शहाजिंदे (लातूर) भूषविणार आहेत. थोर समाजसेवक स्व. बाबा आमटे यांच्या प्रेरणेतून अनाथ व वंचितांसाठी गेल्या २६ वर्षांपासून अविरत सेवा करणाऱ्या शांतीवन या सेवाभूमीत हे संमेलन होत असल्याने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.संमेलनाच्या पहिल्या दिवशी (१० एप्रिल) सकाळी ग्रंथपूजन व ध्वजवंदनाने सुरुवात होईल. उद्घाटन समारंभ कवी विठ्ठल बीडककर व्यासपीठावर पार पडणार असून प्रा. फ. म. शहाजिंदे (लातूर) हे संमेलनाध्यक्ष आहेत. उद्घाटक म्हणून डॉ. दिगंत प्रकाश आमटे, डॉ. अनघा आमटे (लोकबिरादरी प्रकल्प, गडचिरोली) तसेच डॉ. गिरीश कुलकर्णी (स्नेहलय, अहमदनगर) उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री सुरेश धस तर प्रमुख उपस्थितीत भारत ससाणे (IAS) आणि साहित्यिक फ. मु. शिंदे यांचा सहभाग राहणार आहे. यावेळी बालसाहित्य पुरस्काराचे वितरणही होणार आहे.दुपारनंतर कथाकथन सत्रात डॉ. भास्कर बडे (बीड) यांच्या अध्यक्षतेखाली विविध साहित्यिक सहभागी होतील. तसेच बालकुमार मेळाव्यात कवी, लेखक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळणार आहे.पहिल्या दिवशी “मराठवाड्यातील आजचे लेखन किती दर्जेदार?” या विषयावर परिसंवाद होणार असून विविध क्षेत्रातील साहित्यिक आपली मते मांडणार आहेत. सायंकाळी निमंत्रित कवीसंमेलनात अनेक नामवंत कवी सहभागी होऊन काव्यरसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. दुसऱ्या दिवशी (११ एप्रिल) रोजी सकाळी “वेदना जाणवण्यासाठी जागृत संवेदना” या विषयावर संवाद सत्र होणार आहे. यानंतर बालकुमार अभिव्यक्ती कार्यक्रम, विशेष सत्कार सोहळा तसेच “बिघडलेले राजकीय आणि सामाजिक वातावरण सावरणार कोण?” या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. दुपारनंतर बालकुमार साहित्य संमेलनात नवोदितांना व्यासपीठ मिळणार असून संध्याकाळी समारोप समारंभाने संमेलनाची सांगता होईल. या वेळी विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.या संमेलनाच्या निमित्ताने मराठवाड्यातील साहित्यिक, कवी, लेखक, विद्यार्थी आणि रसिकांना एकत्र येऊन साहित्याचा उत्सव साजरा करण्याची संधी मिळणार आहे. आयोजकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
 

 

साहित्य संमेलन पहिल्यांदा सामाजिक संस्थेवर; शांतिवनचा अनोखा उपक्रम

 साहित्य, संस्कृती आणि समाजकार्य यांचा संगम घडवणारा एक अनोखा उपक्रम म्हणून यंदाचे ४५ वे साहित्य संमेलन प्रथमच एका सामाजिक संस्थेच्या परिसरात आयोजित करण्यात आले आहे. अनाथ, वंचित आणि उपेक्षित घटकांसाठी कार्यरत असलेल्या शांतिवन या संस्थेने हा मान मिळवत समाजात नवा आदर्श निर्माण केला आहे.शांतिवन ही संस्था अनेक वर्षांपासून अनाथ मुलांचे संगोपन, शिक्षण, तसेच गरजू घटकांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या घटकांना आधार देण्याचे मोठे काम या संस्थेमार्फत सातत्याने सुरू आहे.अशा संस्थेत साहित्य संमेलन भरवण्यामागे साहित्य आणि सामाजिक बांधिलकी यांचा सेतू उभारण्याचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. यामुळे साहित्यिकांना सामाजिक वास्तवाची जाणीव होईल, तसेच संस्थेतील मुलांना व रहिवाशांना साहित्य-संस्कृतीचा थेट अनुभव घेता येणार आहे.

Advertisement

Advertisement