धाराशिव दि.२(प्रतिनिधी): जिल्ह्याचे आराध्य दैवत असलेल्या आई येडेश्वरी देवीच्या पवित्र चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त येडेश्वरी चैत्र यात्रा महोत्सव २०२६ ला उत्साहात प्रारंभ झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी सर्व भाविकांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
पालकमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, येडेश्वरी देवीची यात्रा ही राज्यातील एक महत्त्वाची धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा असून दरवर्षी लाखो भाविक या यात्रेत सहभागी होऊन देवीचे दर्शन घेतात. ही परंपरा आपल्या श्रद्धेची व संस्कृतीची मोठी ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले.
यात्रेदरम्यान भाविकांना सुरक्षित, सुकर आणि सुखद प्रवासाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून विशेष बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे. अधिक बसफेऱ्या, योग्य व्यवस्थापन आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी एसटी महामंडळावर सोपविण्यात आली असून प्रशासन यासाठी पूर्णपणे कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
तसेच, भाविकांनी यात्रेदरम्यान शिस्त पाळावी, स्वच्छतेची काळजी घ्यावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.
आई येडेश्वरी देवीच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्य लाभो, अशी प्रार्थना व्यक्त करत त्यांनी पुन्हा एकदा सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करा
