बीड दि.२७ (प्रतिनिधी): चकलांबा येथील ठाणेदारावर झालेल्या एसीबीच्या कारवाईनंतर या प्रकरणात एका खाजगी 'वैद्याची' झालेली कथित एन्ट्री आणि त्याच्याकडून एसीबीच्या नावावर केलेल्या मागणीच्या लाखमोलाच्या 'बाळ' बोध संभाषणाची समोरच्या व्यक्तीने केलेली रेकॉर्डिंग यामुळे सध्या पोलीस वर्तुळात वादळ उठले आहे. मात्र या साऱ्या प्रकरणात मागणीचा 'डोस' मर्यादेपेक्षा झाल्यानेच कथित रेकॉर्डिंग तयार झाल्याचे आता सांगितले जात आहे.
एसीबीने चकलांबा येथील ठाणेदारावर 'ट्रॅप' टाकला होता. या प्रकरणात ठाणेदार आणि आणखी एका कर्मचाऱ्याला अटक देखील झाली होती. त्यानंतर या प्रकरणातील मूळ रेकॉर्डिंगचा संदर्भ घेत एसीबीच्या नावावर एका खाजगी व्यक्तीने एका कर्मचाऱ्याचा मोबाईल खट'खटव'ला आणि त्यात बाळबोध संभाषण करत १० लाखाची मागणी करण्यात आली अशी माहिती आहे. समोरच्या व्यक्तीची थोडीफार तडजोड करण्याची तयारी होती असेही सांगितले जाते, मात्र खाजगी 'वैद्याने' दिलेला डोस हा फारच वरच्या मात्रेचा असल्याने शेवटी नाईलाजाने संबंधित कर्मचाऱ्याने 'रेकॉर्डिंग' केल्याचे सांगितले जाते. आता त्याच कथित रेकॉर्डिंग बीड एसीबीच्या प्रतिष्ठेलाच अडचणीच्या ठरणार का हा प्रश्न निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आता रेकॉर्डिंगचे प्रकरण वाढू नये यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर नेटवर्क वापरले जात असून कसेही करून या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी अनेकजण धडपडत आहेत.
यापूर्वीही एकदा प्रसिद्ध झाले होते एसीबीचे रेटकार्ड
बीड जिल्ह्यात एसीबी भोवती आरोपांचे वादळ निर्माण होण्याची ही काही पहिली वेळ नाही. काही वर्षांपूर्वी असेच बीड एसीबीच्या संदर्भाने एका व्यक्तीने थेट एसीबीचे रेटकार्डच जाहीर केले होते. त्यात कोणत्या विभागातून किती वसुली केली जाते याचे आकडे देण्यात आले होते. सदर व्यक्तीने याबाबत थेट वरिष्ठांकडे तक्रारी केल्या होत्या आणि त्यातून काही अधिकाऱ्यांच्या बदल्या देखील झाल्या होत्या.

