बीड दि.२६(प्रतिनिधी): भाटसांगवी येथे एका जेवणाच्या कार्यक्रमादरम्यान जुन्या वादातून हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. औरंगपूर येथील गोवर्धन हरिभाऊ पवार यांना जातीवाचक शिवीगाळ करत कुकरी आणि काठ्यांनी मारत गंभीर जखमी केले आहे. या घटनेत ७ ते ८ जण जखमी झाले असून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गोवर्धन पवार हे आपल्या मित्रांसह भाटसांगवी येथे कमलेश बोरवडे यांच्याकडे जेवणासाठी गेले होते. जेवण करून बाहेर येत असताना त्यांना शामराव पडुळे यांची स्कॉर्पिओ गाडी बलभीम बोरवडे आणि विजय बोरवडे हे दगड आणि काठ्यांनी फोडताना दिसले. फिर्यादीने त्यांना विचारणा केली असता, आरोपींनी ‘तुझा यात संबंध नाही’ असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर बलभीम बोरवडे, विजय बोरवडे, किरण सोनवणे, मेघनाथ बोरवडे, महादेव बोरवडे, अजय शेंडगे, करण शेंडगे आणि इतर ४ ते ५ जणांनी हत्यारांसह हल्ला चढवला.या हल्ल्यात बलभीम बोरवडे याने गोवर्धन पवार यांच्या डोक्यात कुकरीने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच सुदाम पडुळे यांच्या डोक्यात काठीने मारहाण करण्यात आली. हल्लेखोरांनी कुहाडीच्या तुंब्याने आणि कोयत्याने पवार व इतर सहकाऱ्यांनाही बेदम मारहाण केली. जखमींवर बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. असून पिंपळनेर पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा
