Advertisement

सर्वाधिक पुरावे माझ्याकडे,विरोधकांनी राजकीय रंग देऊ नये

प्रजापत्र | Sunday, 22/03/2026
बातमी शेअर करा

नागपूर : भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी महिलेच्या लैंगिक शोषण प्रकरणात बुधवारी अटक केली. त्यानंतर आता त्याला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अशोक खरात त्याच्या कार्यालयात महिलांचं लैंगिक शोषण करायचा. त्यांचा लैंगिक छळही करायचा. पोलिसांना यासंदर्भातले ५८ व्हिडीओ मिळाले आहेत. दरम्यान या प्रकरणानंतर विरोधकांकडून विविध आरोप केले जात आहेत. अशोक खरात प्रकरण आणि विरोधकांचे आरोप याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

     हवेत बोलणं, याला काही अर्थ नाही. अशोक खरात प्रकरण गंभीर आहे. आम्ही इंटेलिजन्सच्या आधारे भांडाफोड केला आहे. लाजेखातर किंवा सामाजिक दबावामुळे एकदम महिला पुढे येत नाहीत. त्या पीडितांना धीर देऊन आम्ही महिलांना समोर आणत आहोत. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर मॉनिटरिंग होतं आहे. नाशिक सीपी आणि एसआयटी मिळून हे काम पूर्ण करत आहेत. कुणालाच आम्ही सोडणार नाही. या प्रकरणाला जो राजकीय रंग देण्याचा प्रयत्न चालला आहे तो विनाकारण आहे. विरोधी पक्षातले कोण कोण जायचे खरातांकडे याचे पुरावे माझ्याकडे आहेत. सर्वाधिक पुरावे तर माझ्याकडे आहेत. पण ते पोलिसांकडे आहेत. पोलिसांचं काम पोलीस करत आहेत. खरातांना भेटणाऱ्यांपैकी कुणाचा सहभाग असेल तर त्यावर नक्की कारवाई होईल. पण कुणी भेटलं आहे अशा माणसावर कारवाई करायला लागलो तर मग तुम्हाला माहीत आहे कोण कोण कसं काय करायचं ते तुम्हाला म्हणजेच माध्यमांना माहीत आहे. या प्रकरणात राजकारण करु नये. हा महिलांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे.

 

अशोक खरातसाठी पाण्याची लाईन कुणी दिली?
आपल्या कथित शक्तींचा वापर करुन महिलांना भरीस पाडणं योग्य नाही. काही झालं तरीही शिक्षा होईलच. सरकार ही बाब सहन करणार नाही. कोण कोण भेटलं, फोटो आहेत ते कुणाचेही फोटो असू शकता. पण ज्यांनी मंत्रिमंडळांची बैठक बोलवून अशोक खरातच्या संस्थेला ४० किमीची लाइन टाकून पाणी अशोक खरातांना दिलं त्यांच्याबाबत कोण कोण गप्प आहे? मंत्र्यांबाबत बोलणारे याबाबत का गप्प बसलेत? सिलेक्टिव्ह का बोलत आहात? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना विचारला आहे. तसंच आम्हाला राजकारणात नाही तर महिलांच्या प्रतिष्ठेत इंटरेस्ट आहे. महिलांवर जे अन्याय झालेत त्यासंदर्भात आधी चौकशी होईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Advertisement

Advertisement