नगर : अजित पवार यांचं २८ जानेवारीला विमान अपघातात निधन झालं. त्यानंतर बारामती येथील पोटनिवडणूक होणं बाकी आहे. तसंच राहुरीची पोटनिवडणूकही बाकी आहे. याबाबत प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे. दोन्ही निवडणुका बिनविरोधा व्हाव्यात असा आमचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
बारामती आणि राहुरी येथील पोटनिवडणुकांची घोषणा झाली तर दोन्ही निवडणुका या बिनविरोध व्हाव्यात असा आमचा प्रयत्न असेल. पण आमच्यावर जर निवडणूक लादली गेली तर आम्हीही निवडणूक लढायला तयार आहोत. आज राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा ३९ वा पदवीदान समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी बहाल करण्यात आली. या सन्मानामुळे मुख्यमंत्री आता डॉक्टर देवेंद्र फडणवीस झाले आहेत. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी पोटनिवडणुकीवर भाष्य केले. आज निवडणूक आयोगाची आज महत्त्वाची पत्रकार परिषद होत आहे. यामध्ये पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, याच पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या दोन जागांच्या पोटनिवडणुकीची घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे इथली पोटनिवडणूक बिनविरोध झाली तर सुनेत्रा पवार या जागेवरुन बिनविरोध निवडून येतील हे स्पष्ट आहे.

