पुणे: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. हा तपास योग्य दिशेने होण्यासाठी केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री राम मोहन नायडू यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आ.रोहित पवार यांनी केली.
अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी जीडीसीए (डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन) आणि व्हीएसआर कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी रोहित पवार यांनी मुंबई आणि बारामती पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे त्यांनी गुरुवारी पुण्यातील गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) अपर पोलिस महासंचालक सुनील रामानंद यांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
यानंतर रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, व्हीएसआर कंपनीचे मालक रोहित सिंग हे तेलगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्याशी संबंधित असून त्यांच्या कंपनीला चंद्राबाबूंनी आर्थिक रसद पुरवलेली आहे, तसेच चंद्राबाबूंच्याच पक्षाचे खासदार राम मोहन नायडू हे केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री आहे. विमान अपघात झाल्यानंतर राम मोहन नायडू यांनी विमानाची तपासणी योग्य पद्धतीने झाल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता व्हीएसआर कंपनीच्या विमानात दोष असल्याचे जीडीसीएने जाहीर करत पाच विमानांवर कारवाई केली आहे. यावरून विमान कंपनीच्या मालकाला कोणी तरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, हे स्पष्ट होते. याचा तपास चुकीच्या दिशेने केला जात आहे. हा तपास निष्पक्षपातीपणे होण्यासाठी केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री राम मोहन नायडू यांनी राजीनामा द्यावा, तसेच तेलगू देसम पक्षाच्या कोणत्याही नेत्याला हे मंत्रालय देऊ नये. विमान कंपनीच्या भाजपच्या काही नेत्यांचाही संबंध आहे, त्यामुळे ते मला लक्ष्य करत आहेत, असेही रोहित पवार म्हणाले.
विमान अपघातास जीडीसीए (डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन) आणि व्हीएसआर कंपनी जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आम्ही करत आहोत. गुन्हा दाखल केला जात नसल्याने हा घातपात असल्याची शंका येत आहे. गुन्हा दाखल व्हायला हवा. मात्र, तो आम्ही दाखल करून घेऊ शकत नाही, समजून घ्या, असे पोलिस म्हणतात. अपघाताचा तपास सीबीआयकडे गेल्यानंतर सीआयडीच्या हातात काही राहत नाही. सीबीआयचे अधिकारी महाराष्ट्र आणि अजित पवार यांना कितपत ओळखतात, माहिती नाही. त्यामुळे आम्ही एफआयआर नोंदवून घ्या, अशी मागणी करत आहोत. भाजप नेते सुशांतसिंग यांच्यासाठी कपडे काढून रस्त्यावर उतरत होते. मात्र, त्यांचेच मित्र असलेले अजित पवार यांच्या मृत्यूची फिर्याद नोंदवून घेत नाहीत. सत्तेतीलच काही लोक फिर्याद नोंदवण्यास आडकाठी आणत आहेत. पोलिसांनी आणि सीआयडीने गुन्हा दाखल करून घेतला नाही तर आम्ही न्यायालयात जाऊ, असा इशाराही यावेळी रोहित पवार यांनी दिला.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना बिनविरोध आमदार करावे
उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकी यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याने मी त्यांचे अभिनंदन करतो. बारामती विधान सभेच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा काकी यांच्या विरोधात कोणत्याही उमेदवाराने उभे राहू नये, त्यांची निवड बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षाही रोहित पवार यांनी व्यक्त केली.
कुणाच्या घराची व ब्युटी पार्लरची बिले पक्षाच्या खात्यातून गेली
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना रोहित पवार म्हणाले, आम्हाला अजित दादांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत. त्या बोलण्याची वेळ येऊ देऊ नका. कोणाच्या घरातील कामाची बिले आणि कोणाच्या ब्युटी पार्लरची बिले पक्षाच्या खात्यातून देण्यात आली आहेत, याची माहिती आमच्याकडे आहे.

