छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली, बीड आणि लातूर जिल्ह्यांतील काही भागांत रविवारी रात्री आणि सोमवारी दुपारी अवकाळी पावसासह गारपीट झाली. यामुळे फळबागांसह रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले.
लातूर जिल्ह्यातील रेणापूर, शिरूर अनंतपाळ तालुक्यांतील काही भागांत सोमवारी दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. रेणापुरातील काही गावांत गाराही पडल्या. या पावसामुळे रब्बी पिकांसह आंब्याचा मोहार गळून नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. सोमवारी दुपारी ३.३०च्या सुमारास जोरदार वादळी वारे सुटले. जिल्ह्यातील रेणापूर, शिरूर अनंतपाळ, येरोळ, डिगोळ, अहमदपूर तालुक्यातील किनगाव, औसा तालुक्यातील खरोसा या भागात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे रब्बीतील गहू, ज्वारी, करडईला फटका बसला आहे. तसेच राशीसाठी काढणी केलेला हरभरा भिजला. आंब्याचा मोहर गळाला. द्राक्ष व इतर फळबागांचे नुकसान झाले. रेणापूरसह खरोळा, पोहरेगाव, समसापूर, कोळगाव, राजेवाडी, नेहरूनगर आदी गावांत गारपीट झाली आहे. पाऊण तास वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने ज्वारी भुईसपाट झाली आहे.
अंबाजोगाई तालुक्यात गारांचा मारा व अवकाळी
बीड जिल्ह्यात सोमवारी दुपारच्या सुमारास अनेक तालुक्यांत अवकाळी पाऊस झाला. अंबाजोगाई तालुक्यातील मुडेगाव येथे गारा बरसल्या तर परळी तालुक्यातील रब्बी पिकांना याचा मोठा फटका बसला आहे.
धाराशिव : पिकांचे नुकसान
धाराशिव जिल्ह्यात सोमवारी पहाटेच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसाचा जोर मोठा नसला तरी सोबत असलेल्या वाऱ्यामुळे काढणीला आलेल्या रबी हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे.
वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
लातूर : काही गावांमध्ये पत्र्याच्या घरांचे नुकसान झाले आहे. वायगाव (ता. उदगीर) येथे शेतात काम करत असताना अंगावर वीज पडल्याने दिगंबर राम बेलकुंडे (वय ६०) यांचा मृत्यु झाला आहे.
नांदेडातही मोठे नुकसान
नांदेड : रविवारी रात्रीपासून जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. त्यानंतर २३ फेब्रुवारी रोजी दुपारनंतर जिल्ह्यातील बहुतांश भागांत मेघगर्जनेसह पाऊस झाला. त्यामुळे काढणीला आलेल्या रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले.

