माजलगाव दि.२१ (प्रतिनिधी): माजलगाव शहरातील बीड रोड या मुख्य रस्त्यावर असलेल्या व्यंकटेश लॉज मध्ये एका ४० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला. ही घटना शुक्रवारी रात्री हॉटेल मॅनेजरच्या लक्षात आली असून माजलगाव शहर पोलीसात आकस्मित गुन्ह्याची नोंद करण्यात येत आहे. शहरातील मध्यवस्तीत असणाऱ्या व्यंकटेश या खासगी लॉजमध्ये मुक्कामासाठी थांबलेल्या चाळीस वर्षीय व्यक्तीचा मृतदेह शुक्रवारी रात्री आढळून आला. लॉज कर्मचाऱ्यांना पूर्ण दिवसभर दरवाजा न उघडल्याने संशय आल्यावर दरवाजा उघडण्यात आला. त्यावेळी संबंधित व्यक्ती खोलीत निश्चेष्ट अवस्थेत आढळून आली. या घटनेची माहिती तत्काळ माजलगाव पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी मरून पडलेल्या व्यक्तीजवळ असलेल्या आधार कार्ड वरून सदरील मयत व्यक्ती श्रीकृष्ण प्रकाश डाके (वय ४०) रा. नित्रुड ता.माजलगाव येथील असल्याचे समजते. सदरील व्यक्तीने रविवार (दि.१५) रोजी लॉज मधिल रूम बुक केला असल्याची माहिती आहे. या दरम्यान लॉज कर्मचाऱ्याला लॉज मध्ये सतत दिसणारी व्यक्ती कालपासून रूम बाहेर दिसली नाही. त्यामुळे संशय आल्याने शुक्रवारी रात्री याबाबतीत कर्मचाऱ्यांने सदरील व्यक्ती बाबत पोलिसांना माहिती दिली. असे कळते. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

बातमी शेअर करा
