Advertisement

लोकसेवा आयोगाच्या धाटणीत होतेय पोलीस पाटील भरतीची परीक्षा

प्रजापत्र | Monday, 16/02/2026
बातमी शेअर करा

 बीड दि.१५ (प्रतिनिधी)-बीड जिल्ह्यात वेगवेगळ्या उपविभागातील पोलीस पाटलांच्या रिक्त जागांसाठी येत्या रविवारी (दि.२२) परीक्षा होणार आहे.पोलीस पाटील पदासाठी दहावी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता आहे आणि हे पद अर्थातच वर्ग ४ मध्ये मोडणारे आहे. मात्र या पदाच्या भरती परीक्षेत स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घातले असून अगदी राज्य किंवा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा जशा होतात , त्यातच धाटणीत बीड जिल्ह्यात पोलीस पाटील पदासाठी परीक्षा होणार आहे.
     जिल्ह्यात अनेक वर्षांपासून पोलीस पाटील भरती रखडलेली होती. त्या भरतीला आता मुहूर्त लागला आहे. पोलीस पाटील हे पद तसे चतुर्थ श्रेणीत मोडणारे , पण गाव पातळीवर मानाचे चे असल्याने पोलीस पाटील व्हायला इच्छुक देखील अनेक असतात . आता जिल्ह्यातील पोलीस पाटील पदासाठी रविवारी (दि. २२ ) लेखी परीक्षा होणार आहे. तसेतर पोलीस पाटील निवड समितीचे अध्यक्ष हे संबंधित उपविभागीय अधिकारी असतात, मात्र बीड जिल्ह्यातील या सर्व परीक्षांवर लक्ष ठेवून आहेत ते जिल्हाधिकारी. आता त्यांचेच लक्ष म्हणल्यावर परीक्षा देखील तितक्याच  उंचीच्या होणार . त्यासाठी आता अगदी केंद्रीय अथवा राज्य लोकसेवा आयोगाच्या धाटणीचे नियोजन करण्यात आले आहे.परीक्षेसाठीची उत्तरपत्रिका ओएमआर पद्धतीची असणार आहे. प्रश्नपत्रिकेसोबतच उत्तरपत्रिका असणार असून उत्तरपत्रिकेच्या क्रमांकापासून ते परीक्षार्थ्यांच्या परीक्षा क्रमांकापर्यंत सारे काही लोकसेवा आयोगाच्या धर्तीवरचे असणार आहे. अगदी परीक्षेला ११ वाजता प्रत्यक्ष सुरुवात होणार असली तरी परीक्षार्थ्यांना परीक्षा केंद्रावर ९ वाजता हजार व्हावे लागणार असून १० : ३० नंतर कोणालाही परीक्षा गृहात प्रवेश दिला जाणार नाही. हे सारे आतापर्यंत अनेकांनी लोकसेवा आयोगाच्या परीक्षांना अनुभवले होते, आता प्रशासन तोच अनुभव पोलीस पाटील पदासाठी देखील देणार आहे.

Advertisement

Advertisement