Advertisement

राज्यभर पुन्हा ‘एसटी’ बंद राहणार?

प्रजापत्र | Saturday, 07/02/2026
बातमी शेअर करा

मुंबई दि.७(प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांच्या मासिक भत्त्याबाबत राज्य सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही, तर राज्यभर एसटी बंद करण्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला आहे.

    केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार राज्य सरकारच्या अर्थ विभागाने ११ डिसेंबर १९९८ रोजी एसटी महामंडळातील आगारांची शहरनिहाय अ १, अ, ब १, ब २ अशी वर्गवारी केली. त्यानुसार ‘अ १’ वर्गवारीतील एसटी कर्मचाऱ्यांना दरमहा ३०० रुपये, ‘अ’ वर्गातील कर्मचाऱ्यांना सहा हजार रुपयांपेक्षा जास्त मूळ वेतन असल्यास कर्मचाऱ्यांना २४० रुपये मासिक भत्ता देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार पुणे विभागातील कर्मचारी ‘अ’ वर्गात मोडत असल्याने त्यांना प्रतिमाह २४० रुपये मासिक भत्ता मिळणे अनिवार्य आहे. मात्र, गेल्या दोन दशकांपासून कर्मचाऱ्यांना जुन्या दरानुसार प्रतिमाह ६५ रुपये मासिक भत्ता देण्यात येत आहे, असा आरोप आरोप महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेचे सचिव दिलीप परब आणि सागर दिघे यांनी केला.

ते म्हणाले, ‘छत्रपती संभाजीनगर ‘ब’ वर्गात येत असून, ब २ या श्रेणीतील शहरातील एसटी कर्मचाऱ्यांना दर महिना १२० ऐवजी २५ रुपये भत्ता दिला जात आहे. राज्य सरकारच्या परिपत्रकाचा आधार घेऊन आतापर्यंत कर्मचाऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.या बाबत छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, पुणे आणि राज्यात अनेक ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारबरोबर पत्रव्यवहार करून मासिक वेतन आणि शहराच्या श्रेणी आणि वर्गवारीनुसार ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे पूरक भत्ता देण्याची मागणी केली आहे. मात्र, राज्य सरकारकडून अद्याप कुठलेच उत्तर प्राप्त झाले नसून, निर्णयाबाबतही कोणताही विचार केलेला नाही.’

 

 

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शहराच्या श्रेणी आणि वर्गनिहाय मासिक वेतनानुसार मासिक पूरक भत्ता ठरवून दिला आहे. मात्र, अनेक शहरांतील कर्मचाऱ्यांना नियमाप्रमाणे मासिक भत्ता दिला जात नसून, याबाबत वारंवार मागणी करण्यात आली आहे. याबाबत राज्य सरकारकडून तातडीने निर्णय़ घेतला नाही, तर राज्यात एसटी बंद आंदोलन करण्यात येईल. – दिलीप परब, सचिव, महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटना

Advertisement

Advertisement