आपल्या वाकड्यात शिरायचं नाही, बघतोच तुला असली टगेगिरीची भाषा एखाद्याला भूषणावह वाटणार असेल किंवा राजकारणात 'टगे'पण मिळविण्यात कोणाला आनंद वाटणार असेल तर अशा मानसिकतेला कोणी काही बोलू शकत नाही,पण हे असले टगेपण सामान्यांना नेहमीच आवडते असे नाही.कधीतरी गंमत म्हणून या टगेगिरीला काही लोक टाळ्या वाजवितातही,पण म्हणून जर कोणी टगेगिरी हाच आपल्या राजकारणाचा मार्ग म्हणून निवडणार असेल तर त्याला जनता काहीतरी उत्तर देतच असते.पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील जनतेने ते दिले आहे.तसे तर पुतण्या आणि काकांच्या पक्षाला राज्यभरातच जनतेने त्यांची जागा दाखविली आहेच,पण पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांचा झालेला पराभव ही राजकारणातील टगेगिरीला मारलेली सणसणीत चपराक आहे.
एकीकडे यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या राजकारणातील सुसंस्कृतपणाचा आदर्श म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीचे नाव घ्यायचे आणि त्याचवेळी राजकीय विरोधकांना 'बघून घेण्याची' भाषा करायची,फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांवर चालणार पक्ष म्हणून मिरवायचे आणि त्याचवेळी राज्याच्या सत्तेत भाजपच्या मांडीवर जाऊन बसायचे आणि पुन्हा महानगरपालिका निवडणुकीत त्याच पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे,ज्या काकांनी राजकारणातून निवृत्त व्हावे म्हणून आटापिटा केला,त्यांचा पक्ष फोडला,त्याच काकांना वेळ आल्यावर 'मी पण फार मोठ्या काकांचा पुतण्या आहे'असे सांगत काकांनी आणखी दीर्घकाळ राजकारण करावे असे सांगायचे,राज्याच्या एका भागात जाऊन राजकारणातील गुन्हेगारीवर टीका करायची,पक्षात पदे देताना देखील आम्ही चारित्र्य पडताळणी करून पदे देऊ असे सांगायचे आणि दुसऱ्या भागात चक्क न्यायालयीन कोठडीतील व्यक्तींना उमेदवारी द्यायची.आपण किती खतरनाक आहोत,आपल्या वाकड्यात कोणी गेलो तर आपण त्याला कसे सोडत नाही असली टगेगिरीची भाषा करायची आणि पुन्हा ती टगेगिरी आनंदाने मिरवायची या मानसिकतेचे नाव म्हणजे अजित पवार.
राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांची त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी रंगविलेली प्रतिमा खमक्या माणूस,कामाचा माणूस,प्रशासनावर प्रचंड पकड असलेला माणूस अशी वेगवेगळ्या रंगांनी रंगविलेली असली आणि स्वतः अजित पवारच स्वतःबद्दल 'मी कामाचा माणूस आहे' असे वारंवार सांगत असले तरी अजित पवारांचे मागच्या काही वर्षातील राज्यातील एकूणच राजकारण हे अविश्वासाचे,दुटप्पीपणाचे आणि केवळ संधीसाधू असे राहिलेले आहे.अजित पवार कधीही काहीही बोलू शकतात,ते फार स्पष्टवक्ते आहेत अशीही त्यांची रंगवण्यात आलेली प्रतिमा,पण त्या स्पष्टवक्तेपणाच्या आडून अजित पवार स्वतःचा फटकळपणा कायम गोंजारत आले.राजकारणात किमान काही दिवस एकसुरी चालणे अजित पवारांना माहीतच नाही,त्यामुळे अजित पवारांच्या भूमिका देखील सातत्याने बदलत असतात.काही काळ काही ठिकाणी लोकांना असल्या भूमिकांनी मुर्खात काढता येते,पण हे सदा सर्वकाळ जमत नसते.जेथे केवळ भक्तांचाच भरणा आहे,तेथे एकवेळ असली टगेगिरी टाळ्या मिळवून जाते देखील,पण दीर्घकाळ जनतेच्या डोळ्यात धूळ टाकता येत नसते. महानगरपालिका निवडणुकीत पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये याच धूळफेकीला आणि टगेगिरीला जनतेने सणसणीत चपराक मारली आहे.पिंपरी चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो,किमान अजित पवारांच्या भक्तांना तसे वाटते,त्याच हवेत अजित पवारांनी आ.महेश लांडगे यांना गृहीत धरले,ते काय करणार याच अविर्भावात राहिले,'माझं पुणं,माझं पुणं' असे अजित पवार सातत्याने म्हणत असताना या पुण्यासाठी केले काय आणि याच पुण्यात इतरही नेते आहेत याचा विसर अजित पवारांना पडला. मुरलीधर मोहोळ असतील किंवा आणखी कोणी, अजित पवारांच्या मानसिकतेत त्या कोणाचीच काहीच शक्ती नाही असेच ठाम बसलेले आहेत आणि त्याच सत्तेच्या अहंकाराला पुणेकरांनी जागा दाखविली आहे.
पक्षात असेल किंवा कोठेही,सारे काही मलाच कळते,मी सांगेल तेच ही मानसिकता अजित पवार जपत आले आहेत.त्यातूनच मग 'युती आवडली नाही 'म्हणणाऱ्या दिलीप वळसे पाटलांची दखल घेण्याची आवश्यकता पवारांना वाटली नाही,छगन भुजबळ यांच्याबद्दल तर अढी आहेच,तटकरे अलिप्त आहेत याचे देखील काही दुःख नाही,धनंजय मुंडेंबद्दल तर अलिप्तताच ठेवायची,म्हणजे नवा पक्ष उभा करायला जे-जे झटले,त्यांच्या शब्दाला किंवा मताला देखील किंमत द्यायची नाही आणि आपलेच म्हणणे रेटून न्यायचे हे बारामतीमध्ये किंवा बीडमध्ये एकवेळ खपून जाईल.बीडसारख्या जिल्ह्यात तर बाहेरच्यांचा उदोउदो होतोही,पण पुणेकरांनी दुटप्पी राजकारणाला सणसणीत चपराक लगावली.एकीकडे भाजपसोबत सत्तेच्या शय्येवर सोबत करायची आणि पुन्हा त्याच पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, काकांवर टीकाही करायची आणि त्याच काकांच्या सोबतही राहायचे या साऱ्याचा जनतेला कधी ना कधी वीट येतच असतो. राजकारणातील विश्वासार्हता , भूमिका संपली की कोणीतरी त्याला चपराक लागवतेच, ती संधी पुणेकरांनी घेतली इतकेच. मुळातच अजित पवारांनी राष्ट्रवादी फोडून भाजपसोबत जाणे राज्याला फारसे रुचले नाही, हे वारंवार दिसून आले आहेच. आताही २९ महानगरपालिकांपैकी एकही ठिकाणी अजित पवारांना स्वबळावर सत्ता मिळविता आलेली नाही. एखादा अपवाद वगळता , त्यांना सोबत घेण्याची फारशी कोणाला आवश्यकता पडेल अशी परिस्थिती नाही आणि तेव्हढी त्यांच्या पक्षाची शक्ती दिसलेली नाही. साधारण २८०० पेक्षा अधिक नगरसेवकांमध्ये अजित पवारांच्या पक्षाला १६७ म्हणजे दोनशेपेक्षाही कमी जागा मिळविता आल्या यावरूनच राज्यातील जनतेने अजित पवारांना त्यांच्या आजपर्यंतच्या 'कामाची ' काय पावती दिली आहे हे त्यांनी समजून घ्यायला हरकत नाही.

