बीड-जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांना वेळ असताना आता जिल्ह्यातील कालावधी पूर्ण होत असलेले एक पोलीस निरीक्षक आणि सात सहाय्यक पोलीस निरीक्षक यांची बदली होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्यात.दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे प्रभारी अधिकाऱ्यांची बदली करणे अपेक्षित आहे.त्यामुळे आता या आठ अधिकाऱ्यांच्या जागी एसपींकडून नवीन शिलेदार दिले जाणार की जुन्या अधिकाऱ्यांनाच (सर्वसाधारण बदल्यापर्यंत) मुदतवाढ मिळणार या चर्चांना ऊत आला आहे.विशेष म्हणजे राजकीय वशिलेबाजीकडेही अनेक अधिकाऱ्यांचा कल मागच्या काही काळापासून वाढत असल्याने आता या बदल्यात तरी पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत हे पारदर्शकपणा राबवत 'सब घोडे बारा टक्के' प्रमाणे भूमिका घेतील का हे ही पाहणे महत्वाचे आहे.
बीड जिल्ह्यात मागच्या वर्षभराच्या कार्यकाळात पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी गुन्हेगारी आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चांगले प्रयत्न केले.जिल्ह्यात शिस्तप्रिय अधिकाऱ्याची गरज होती.ती त्यांच्या रूपातून बीडकरांना प्राप्त झाली.पोलीस अधिक्षकांनी धोरणे राबविताना अपवाद वगळता सर्वांगीण भूमिका घेतल्याचे सर्वश्रुत आहे.मात्र मागच्या दोन महिन्यापूर्वी साधारण कोणतेही मोठे कारण नसताना पोलीस दलातील चार जणांची खांदेपालट करण्यात आली.हे करण्यामागे राजकीय दबाव असल्याच्या चर्चाही मोठ्याप्रमाणावर झाल्या. पोलीस अधिक्षकांच्या आतापर्यंतच्या सर्व भूमिकेला एकंदरीतच यामुळे काही प्रमाणात गालबोट लागले होते.अखेर आता पुन्हा एकदा सात सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि एका पोलीस निरीक्षक यांचा कार्यकाळ जानेवारीअखेर (दोन वर्षांचा) पूर्ण होत आहे.त्यामुळे या आठ अधिकाऱ्यांची बदली करताना पोलीस अधिक्षक राजकीय वशिलेबाजीतुन निर्णय घेतात की सब घोडे बारा टक्के' प्रमाणे कर्तव्य निभावतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आयजींसोबत चर्चेनंतर घेतला जाणार निर्णय
पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी आठ अधिकाऱ्यांच्या बदल्याबाबत 'प्रजापत्र'शी बोलताना जो निर्णय घेण्यात येणार आहे त्यासाठी आपण आयजी विरेंद्र मिश्रा यांच्याशी चर्चा करणार आहोत असे सांगितले.सर्वसाधारण बदल्यांपूर्वी प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदल अपेक्षित असतील तर त्याची कल्पना विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना असायला हवी.त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करूनच याचा निर्णय घेण्यात येईल असे बीडच्या पोलीस अधिक्षकांनी स्पष्ट केले.
या आठ प्रभारी अधिकाऱ्यांचा समावेश
बालक कोळी (माजलगाव ग्रामीण,पोलीस निरीक्षक),मंगेश साळवे (अंभोरा,सहाय्यक पोलीस निरीक्षक),भार्गव एस.सपकाळ (अंमळनेर,सहाय्यक पोलीस निरीक्षक),चंद्रकांत गोसावी (नेकनूर,सहाय्यक पोलीस निरीक्षक),मधुसुदन घुगे(पिंपळनेर,सहाय्यक पोलीस निरीक्षक),देविदास बी.वाघमोडे (धारूर,सहाय्यक पोलीस निरीक्षक),मच्छिंद्रनाथ जी.शेंडगे (युसुफवडगाव-सहाय्यक पोलीस निरीक्षक),गोरखनाथ बी.दहिफळे(सिरसाळा,सहाय्यक पोलीस निरीक्षक) या आठ प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदल्या कालावधी पूर्ण होत असल्याने जानेवारीअखेरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित मानले जात आहे.
निवडणुकांच्या तोंडावरच नुतून ठाणेप्रमुखांना असणार आव्हान
पोलीस अधिक्षकांनी बदल्यांमध्ये आयजी यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केल्यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर ठाणेदारांची बदली करत त्या ठिकाणी नवीन अधिकाऱ्यांची नेमणुक करणे अडचणीचे ठरू शकते.बीड जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी साधारण मार्च-एप्रिलमध्ये निवडणूक कार्यक्रम लागण्याची दाट शक्यता आहे.त्यापार्श्वभूमीवर कालावधी पूर्ण झालेले अधिकारी बदलेले तर नवीन अधिकाऱ्यांना ठाण्यांचा आढावा आणि माहिती होण्यासाठी काही काळ लागणे अपेक्षित आहे.त्यामुळे घटकप्रमुख असलेले नवनीत कॉवत आता काय भूमिका घेतात याकडे पोलीस दलाचे लक्ष्य लागलेले आहे.

