मुंबई: आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर मविआचे भविष्य काय? असा प्रश्न उपस्थित झाला होता. जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असेल? याचीही चर्चा झाली. तसेच मनसेच्या उत्तर भारतीयांच्या भूमिकेबाबत काँग्रेसला आक्षेप होता. अखेर काँग्रेसने ही निवडणूक स्वबळावर लढविण्याची घोषणा केली आहे.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. मुंबई महानगरपालिकेतील सर्व २२७ जागांवर लढण्याची तयारी काँग्रेसने केली असल्याचे ते म्हणाले.मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेस संसदीय कार्य समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज मुंबईत संपन्न झाली. मुंबई काँग्रेस अध्यक्ष व खासदार वर्षा गायकवाड, महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, मुंबई प्रभारी यूबी व्येंकटेश यांची प्रमुख उपस्थिती या बैठकीला होती. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना चेन्नीथला म्हणाले की, आम्ही स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

