नागपूर :वाहतुकीचे नियम मोडल्यानंतर वाहनचालकावर कारवाई करत असताना वाहतूक पोलीसकडे बॉडी कॅमेरा असणे आवश्यक असल्याचा नियम गोव्यात करण्यात आलेला आहे. बॉ़डी कॅमेरा नसेल तर वाहतूक पोलीसाला ई-चलनची कारवाई करता येत नाही. महाराष्ट्रातही काही प्रमुख शहरात टप्प्याटप्प्याने हाच नियम करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत बोलत असताना दिली.
विधानपरिषदेतील तारांकित प्रश्नाला उत्तर देत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ई-चलनची कारवाई करत असताना अनेकदा वाहनचालक आणि वाहतूक पोलिसांत वाद होतात. बॉडी कॅमेरा असेल तर या प्रकारांना काही प्रमाणात आळा बसेल. तसेच भविष्यात एखादा वाद झाल्यास त्याच्यावर निर्वाळा करण्यात येऊ शकतो.वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास वाहन चालकांवर कारवाई केली जाते. वाहतूक पोलीस अधिकारी आणि अंमलदार ई-चलनची कारवाई करतात. मात्र ही कारवाई करत असताना काही अधिकारी खासगी मोबाइलचा फोनचा वापर करत आहेत. तसेच स्वतःच्या सोयीनुसार ई-चलन प्रणालीमध्ये अपलोड आणि चुकीच्या पद्धतीने चलन तयार करीत आहेत. यातून वाहनचालकांची लूट होत असल्याचा प्रश्न शिवसेनेचे (ठाकरे) आ.सुनील शिंदे यांनी तारांकित प्रश्नाद्वारे विधानपरिषदेत विचारला होता. या प्रश्नाचे उत्तर देत असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी बॉडी कॅमेऱ्याचा वापर करणार असल्याचे सांगितले.

