Advertisement

नांगरे पाटलांच्या नावाचा वापर करून सेवानिवृत्त अधिकाऱ्याची फसवणूक

प्रजापत्र | Friday, 11/07/2025
बातमी शेअर करा

 विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाचा वापर करत सेवानिवृत्त अधिकाऱ्याला ७६ लाखांनी गंडा घातल्याचा धक्कादायक उघडकीस आला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ही घटना घडली. यावेळी भामट्यांनी ६ दिवसांत चक्क ७८ लाख ६० हजारांनी या माजी अधिकाऱ्यांना लुटलं. याप्रकरणी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासही सुरु करण्यात आला आहे.

         फसवणूक झालेले सेवानिवृत्त अधिकारी ७७ वर्षांचे आहेत. ते विभागीय आयुक्तालयात कार्यरत होते. २ जुलै २०२५ रोजी त्यांना पोलिसांच्या गणवेशात एका व्यक्तीने व्हिडीओ कॉल केला. यावेळी त्याने आपलं नाव संजय पिसे असल्याचं सांगितलं. तसेच आपण विश्वास नांगरे पाटील यांचा सहकारी असल्याची बतावणीही त्याने केली.

पुढे त्याने तुमच्या पत्नीच्या बँक खात्यात २ कोटींचा बेहिशेबी व्यवहार झाला असून या पैशांचा संबंध दहशतवादी अब्दुल सलामशी असल्याचं म्हटलं. इतकच नाही तर त्याने त्यासाठी तु्म्हाला २० लाख रुपये दिले अशी आम्हाला शंका असून त्याची आम्हाला चौकशी करायची आहे, अशी बतावणी त्याने केली. तसेच बँक खात्याचे तपशील मागितले. न दिल्यास अटक करण्यात येईल, अशी धमकीही त्याने दिली.अशा परिस्थिती घाबरलेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याने त्याला बँक खात्याचा तपाशील दिला. त्यानंतर सहा दिवसांत एकूण ७८ लाख ६० हजार रुपये त्यांच्या खात्यातून लंपास झाले. अखेर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी थेट पोलिसांत धाव घेतली. तसेच याप्रकरणी तक्रार दाखल केली. फोन करणाऱ्याने थेट आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांच्याशी सल्लामसलत करण्याचा सल्ला दिला होता, असंही त्यांनी पोलिसांनी सांगितलं.

Advertisement

Advertisement