Advertisement

धनंजय मुंडेंनी संदीप क्षीरसागरांवर काय केले आरोप

प्रजापत्र | Sunday, 29/06/2025
बातमी शेअर करा

बीड दि.29 (प्रतिनिधी): बीडच्या उमाकिरण शैक्षणिक संकुलात घडलेला प्रकार दुर्दैवी आहे. यातील आरोपी विजय पवारला राजकीय बळ आहे, बीडचे स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर यांनी त्याला शिवजयंती समितीचं अध्यक्ष केलं होतं. गुन्हा दाखल झाल्यानंतरही आ.संदीप क्षीरसागर आरोपीसोबत होते. त्यांचे संबंध नेमके कशाचे आहेत? हे संबंध आर्थिक आहेत की आणखी काही असा घणाघात आ.धनंजय मुंडे यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची महिला आयपीएस अधिकार्‍यामार्फत एसआयटी नेमून चौकशी केली जावी असेही आ.धनंजय मुंडे म्हणाले.
बीडच्या उमाकिरण शैक्षणिक संकुलात घडलेल्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर आ.धनंजय मुंडे यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधला. उमाकिरण मध्ये एक प्रकार समोर आलाय मात्र अशा अनेक घटना घडलेल्या असाव्यात असा संशय असल्याचे आ.मुंडे म्हणाले. कमी शुल्काचे आमिश दाखवून विद्यार्थ्यांना वाममार्गाला लावण्याचा प्रकार विजय पवारच्या माध्यमातून होत होता असा दावाही आ.धनंजय मुंडे यांनी केला आहे.
विजय पवारला हे सर्व करता आले त्या मागे त्याला राजकीय आश्रय होता. स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर यांनी त्याला बळ दिले असेही मुंडे म्हणाले. गुन्हा दाखल झाला त्या दिवसाचे दोन आरोपी आणि स्थानिक आमदाराचे सीडीआर काढावेत असे आव्हान देखील आ.धनंजय मुंडे यांनी पोलीस प्रशासनाला दिले. पोलीस ज्या पद्धतीने हा तपास करत आहेत त्या पद्धतीने आरोपीला शिक्षा होईल असे वाटत नाही त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी महिला आयपीएस अधिकार्‍यामार्फत एसआयटी गठीत करून व्हावी अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत असेही आ.मुंडे म्हणाले. 

Advertisement

Advertisement