Advertisement

केंद्राच्या नियमांनंतरही खाजगी क्लासेस (Private Coaching) अनियंत्रित, अनिर्बंध आणि मोकाटच

प्रजापत्र | Saturday, 28/06/2025
बातमी शेअर करा

बीडच्या उमाकिरण (Umakiran)शैक्षणिक संकुलात जे काही घडले, त्यामुळे शिक्षण क्षेत्र हादरून गेले आहे. खाजगी कोचिंग(Private Coaching) क्लासेसच्या दुकानांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा कशी धोक्यात आहे हेच यातून समोर आले आहे. मुळात केंद्र सरकारने खाजगी कोचिंग क्लासेससाठी अनेक नियम(Regulations) केले आहेत, मात्र महाराष्ट्रात अद्यापही त्या नियमांची अंमलबाजवणी होऊ दिली जात नाही. विद्यार्थ्यांची सुरक्षा, क्लासेसकडून आकारले जाणारे शुल्क, क्लासेससाठीची जागा आणि साऱ्याच बाबतीत केंद्र सरकारचे नियम सर्रास धाब्यावर(violation) बसवून खाजगी कोचिंग क्लासेस अनिर्बंध आणि अनियंत्रित अवस्थेत मोकाट सुटले आहेत. सरकारपेक्षाही मोठे होऊ पाहणाऱ्या खाजगी क्लासेसच्या उधळलेल्या वळूला वेसण घालणे आवश्यक आहे.

मागच्या काही काळात देशभरातच खाजगी कोचिंग क्लासेसचे पीक वारेमाप वाढले , इतके की अगदी तालुक्याच्या ठिकाणी देखील क्लासेसच्या मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्या. खाजगी कोचिंग क्लासेसची खरोखर आवश्यकता आहे का किंवा ते असावेत का याबद्दल मतमतांतरे आहेतच, पण जे क्लासेस आहेत ते तरी किमान नियम पाळणारे आहेत का हे पाहणारी यंत्रणाच महाराष्ट्रासारख्या राज्यात अस्तित्वात नाही. खाजगी कोचिंग क्लासेसचे नियमन(Calching regulation)नेमके करायचे कोणी याबद्दलच शासकीय यंत्रणेत एकवाक्यता नाही, आणि त्यामुळे मग खाजगी कोचिंग क्लासेस नावाची यंत्रणा अनिर्बंध झाली आहे.
या कोचिंग क्लासेसमधून जे  शिक्षण दिले जाते, शिकविणारे कोण असतात , यावर पुन्हा प्रकाश टाकूच , पण बीडच्या 'उमकिरण'मध्ये (Umakiran)जे काही घडले ते शिक्षण क्षेत्राला काळिमा  फासणारे (Henious)आहे. पालक आपल्या पाल्यांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी कोचिंगवाल्यांच्या भरोशावर पाठवत असतात, त्याठिकाणी त्यांच्या भावविश्वाशी असे प्रकार करणे म्हणजे नालयाकपणाचा कळस आहे.ज्याच्यावर पोक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल झाला ती व्यक्ती कोचिंग क्लासेस संघटनेचे राज्यपातळीवर नेतृत्व करते(Coaching classes association), कदाचित त्यामुळेही या घटनेचा निषेध करण्यासाठी खाजगी कोचिंग क्लासेस चालविणारे कोणी समोर आले नाहीत, यावरूनच या लोकांच्या संवेदना किती गारठला आहेत हे स्पष्ट होते .
प्रश्न एकट्या 'उमकिरण' चा नाही, किंवा समोर आलेल्या एक दोन आरोपींचा देखील नाही. मूद्दा आहे तो या क्लासेस नावाच्या दुकानात विद्यार्थ्यांचे भवितव्य कितपत सुरक्षित आहे याचा. या कोचिंग क्लासेसच्या बाहेर जे टवाळखोर नेहमी उभे असतात , त्याबद्दल क्लासेसवाले कधीच काही बोलत नाहीत. त्याठिकाणी विद्यार्थिनींशी छेडछाड (Molestation) झाली तर त्याची वाच्यता होऊ नये यासाठी उलट धडपड सुरु असते. खाजगी कोचिंग क्लास हे 'प्रोफेशन'(profession)होते, त्याचा धंदा कधी झाला हे व्यवस्थेच्या लक्षात आलेच नाही. आम्हीच कसे क्लासेसच्या क्षेत्रात 'युनिक '(Unique)आहोत हे मोठ्या 'हर्षा'ने उर बडवून केकाटायचे  , आपणच आपले कथित 'सक्सेस'(Success) ओरडून ओरडून सांगणारे क्लासेसच्या धंदेवाले विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत मात्र चकार शब्द बोलत नाहीत. कोचिंग क्लासेसमध्ये एका विद्यार्थ्याला किमान १ स्क्वेर मीटर जागा असणे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने बंधनकारक केले आहे, त्या ठिकाणी अग्निसुरक्षा व्यवस्था असणे आवश्यक आहे, मात्र खुराड्यासारख्या जागेत विद्यार्थी  कोंबून केवळ माया जमविण्याचा धंदा मागच्या काळात क्लासेसच्या क्षेत्रात झाला आहे. याला काही अपवाद असतीलही, नाही असे नाही, मात्र ते बोटावर मोजण्याइतकेच. असे जे काही अपवाद आहेत, त्यांना देखील अडचणीत आणण्यासाठी खाजगी क्लासेसवाल्यांच्या काही 'संघटित '(Organised)दुकानदाऱ्या आहेतच. एकाच छताखाली सारे काही अशा जाहिराती पूर्वी शॉपिंग मॉलच्या (Shopping mall) यायच्या, आता त्या कोचिंग क्लासेसच्या येत आहेत, इतके हे क्षेत्र बिघडले आहे. पण पुन्हा प्रश्न तोच, याला वेसण घालायची कोणी ? हा मस्तवाल वळू आता सामाजिक स्वास्थ्यालाच धडका देत असताना , केंद्राचे नियम राज्यात लागू होऊच द्यायचे नाही यांच्यात 'विजय ' मिरविणारे लोक या व्यवस्थेत आहेत. एखाद्या सरकारपेक्षाही क्लासेसवाल्यांची लॉबी वरचढ होणार असेल तर त्यांच्यात मस्ती येणारच आणि ते मोकाट सुटणारच, त्यामुळे आता असल्या मस्तवालपणाच्या विरोधात जनआंदोलन उभे राहायला हवे. (क्रमशः )

Advertisement

Advertisement