Advertisement

दिव्यांग किंवा वैद्यकीय प्रमाणपत्रात बनावबनवी केली तर शिक्षकांवर दाखल करा फौजदारी गुन्हे

प्रजापत्र | Tuesday, 17/06/2025
बातमी शेअर करा

  बीड दि. १६ (प्रतिनिधी ) : बदली टाळण्यासाठी किंवा सोयीच्या ठिकाणी बदली मिळविण्यासाठी संवर्ग १ च्या सवलतीचा गैरफायदा घेत कोणत्या शिक्षकाने दिव्यांग किंवा वैद्यकीय प्रमाणपत्रात बनवाबनवी केली किंवा खोटे घटस्फोट, परित्यक्ता प्रमाणपत्र सादर केले तर अशा शिक्षकांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. विशेष म्हणजे असे प्रकार उघड होऊनही गुन्हे दाखल केले नाहीत तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. यामुळे आता 'संवर्ग १ ' च्या लाभासाठी बनवाबनवी करणारांचे धाबे दणाणले आहेत.
राज्यात सध्या शिक्षणाच्या ऑनलाईन बदल्या सुरु आहेत. या बदली प्रक्रियेतून ' संवर्ग १ ' मध्ये येणाऱ्या शिक्षकांना सवलत आहे. त्यासाठी अनेकांनी दिव्यंगत्वाचे, दुर्धर आजाराचे, परित्यक्ता किंवा घटस्फोटाचे  खोटे प्रमाणपत्र दाखल केल्याचे समोर आले होते किंवा अजूनही तशा तक्रारी येत आहेत. त्यामुळे आता राज्य शासनाने यासंदर्भाने कठोर भूमिका घेतली आहे. 'संवर्ग १ ' चा लाभ घेण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या कागपत्रांमध्ये किंवा वैद्यकीय प्रमाणपत्रामध्ये काही बनवाबनवी, बनवाटपणा आढळून आला तर तात्काळ संबंधित शिक्षकावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. तसा शासन निर्णय सोमवारी काढण्यात आला आहे. विशेष म्हणजे असा बनावट प्रकार समोर येऊन देखील गुन्हे दाखल झाले नाहीत तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
 

जिल्हा शल्यचिकित्सकांकडून तपासणी
संवर्ग १ चा लाभ घेण्यासाठी एखाद्या शिक्षकाने दाखल केलेल्या प्रमाणपत्रावर किंवा संबंधितांच्या आजारावर, दिव्यांत्वावर अधिकाऱ्यांना संशय आला तर अशा प्रमाणपत्रासाठी गठीत तरी सदस्सीय समितीने संबंधित शिक्षकाची, प्रमाणपत्राची जिल्हा शल्यचिकित्सकांमार्फत तपासणी करण्याचे निर्देश देण्यात देण्यात आले आहेत.

 

काय आहे संवर्ग १
जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीबाबाबत बदलीपासून संरक्षण मिळविण्यासाठी किंवा बदलीच्या ठिकाणाबाबत प्राधान्यासाठी संवर्ग १ निर्माण करण्यात आला आहे. यात विविध आजारांनी ग्रस्त शिक्षक, दिव्यांग शिक्षक, दिव्यांग मुलांचे पालक, परित्यक्ता घटस्फोटित महिला शिक्षक , वयाची ५३ वर्ष पूर्ण झालेले शिक्षक, विधवा, कुमारिका शिक्षक यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

Advertisement

Advertisement