बीड दि.२८ (प्रतिनिधी)-स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर कालावधी पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरु झाली असताना बीडचे पोलीस उपाधीक्षक विश्वंभर गोल्डे सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या जागी नियुक्ती मिळविण्यासाठी स्वप्नील राठोड व दिलीप टिपरसे हे दोन अधिकारी आघाडीवर आहेत.३१ मे ला बीडच्या पोलीस उपाधीक्षकपदावरून श्री.गोल्डे सेवानिवृत्त झाल्यानंतर या ठिकाणी कोणाची नियुक्ती होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सध्या सुरु झाली आहे.बीडमध्ये कार्यकाळ पूर्ण झालेल्या काही अधिकाऱ्यांची बदली झाली असून बीडच्या अप्पर पोलीस अधिक्षक,गेवराई,बीड पोलीस उपाधीक्षक यांच्या बदल्या होणे बाकी आहे.तर ३१ मे च्या आत या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण होण्याचा अंदाज असून बीडच्या डीवायएसपीसाठी धाराशिववरून स्वप्नील राठोड आणि गंगाखेडमधून डॉ.दिलीप टिपरसे यांच्या नावाची सध्या चर्चा सुरु झाली आहे.स्वप्नील राठोड यांनी गेवराईत डीवायएसपी म्हणून दीर्घ काळ काम केले होते.त्यानंतर त्यांची बदली झाली.आता ते पुन्हा बीड जिल्ह्यात येण्यासाठी इच्छुक असल्याचे कळते.तर दुसरीकडे बीडच्या ठिकाणी डॉ.दिलीप टिपरसे देखील रुजू होण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती आहे.गंगाखेडमध्ये कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांची बदली होणार असल्याने ते बीडला येण्यासाठी परिश्रम घेत असल्याचे कळते.दरम्यान श्री.राठोड,श्री.टिपरसे यांच्यापैकी कोणी की अन्य कोणत्या अधिकाऱ्याला बीडमध्ये येण्याची संधी मिळते हे पाहणे महत्वाचे ठरेल.
दोन्ही अधिकारी चर्चेतील
स्वप्नील राठोड हे बीडला येणार असल्याच्या चर्चा मागच्या काही कालावधीपासून सुरु आहेत.त्यांनी बीड जिल्ह्यात काम केले असल्याने त्यांना येथील सर्व 'परिस्थिती'चा चांगला अभ्यास आहे.तर मागच्या काही दिवसांत धाराशिवमध्ये साक्षी कांबळे आत्महत्याप्रकरणावरून त्यांच्या नावाची मोठी चर्चा झाली होती.कांबळे यांच्या तपासावरून देखील त्यांना बाजूला करण्यात आले होते.आता ते बीड जिल्ह्यात येण्यासाठी इच्छुक असल्याचे कळते.तर दुसरीकडे दिलीप टिपरसे देखील बीडसाठी इंटरेस्ट घेऊन आहेत.तुळजापूरमध्ये दिलीप टिपरसे यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली होती.सामाजिक कार्यकर्ते राजभाऊ माने व त्यांच्या सहकाऱ्याला अवैध धंद्यांची बातमी प्रसिद्द झाल्याने बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडल्याचे सांगितले जाते.याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात सामाजिक कार्यकर्त्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला.मात्र न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दाखल घेऊन हा गुन्हा रद्द केला होता.तर टिपरसे यांची बदली तातडीने छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आली होती.साधारण चार वर्षांपूर्वी हा सर्व प्रकार घडला होता.दरम्यान सध्या गंगाखेडमध्ये त्यांचे काम चांगले राहिले असून आता बीडला येण्यासाठी ते इच्छुक असल्याचे कळते.दरम्यान ज्या दोन्ही अधिकाऱ्यांच्या सध्या चर्चा सुरु आहेत त्यांची नावे देखील वेगवेगळ्या प्रकरणांमुळे चर्चेत राहिलेले आहेत.